Viral Video: भटक्या कुत्र्यांकडून होणारे हल्ले, त्यांच्यामुळे होणारा त्रास याबद्दल अनेकदा चर्चा होत असते. एकीकडे भटक्या कुत्र्यांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी वारंवार होत असताना, दुसरीकडे प्राणीमित्र मात्र त्याचा विरोध करताना दिसतात. नोएडामध्ये तर पाळीव कुत्र्यांनीही लोकांवर हल्ला केल्याच्या अनके घटना काही महिन्यांपूर्वी प्रचंड चर्चेत होत्या. या घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, नोएडात पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे.
नोएडामधील सोसायटी पार्कमध्ये एक महिला आणि तिच्या श्वानावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. नोएडाच्या सेक्टर 18 मधील महागुण मॉडर्न सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीमधील एका व्यक्तीने कॅमेऱ्यात ही घटना कैद केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
महिलेने आपल्या पाळीव श्वानाला पार्कात फिरण्यासाठी नेलं होतं. यावेळी तिथे फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी महिलेच्या पाळीव श्वानावर हल्ला करण्यास सुरुवात केली. आपल्या श्वानाला वाचवण्यासाठी महिलेने त्या कुत्र्यांना हटकण्यास सुरुवात केली. पण कुत्रे आक्रमक होऊ लागल्याने महिलेने श्वानाला उचलून घेतलं. यानंतर कुत्र्यांनी महिलेवरही हल्ला करण्यास सुरुवात केली. यानंतर महिला अक्षरश: पार्कात धावत होती. तिथेही कुत्रे या महिलेचा पाठलाग करत होते.
Disturbing scenes from Noida's Mahagun Mezzaria Society where stray dogs attack a woman and her pet.
— Rishi Bagree (@rishibagree) April 19, 2023
Thanks to the Dog Lovers in every such society where they neither adopt them nor they’ll allow others to evict them from the complex.https://t.co/rSYRvyhfOv
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, महिला आपल्या श्वानाला हातात घेऊन पार्कात धावताना दिसत आहे. कुत्र्यांना चकवण्यासाठी महिलेने झुडपांवरुनही उडी मारली. पण यानंतरही कुत्रे पाठलाग करणं सोडत नव्हते. यावेळी पार्कात इतर लोक दिसत आहेत. पण कोणीही मदतीला धावत नाही. पण काही लहान मुलं नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी धावताना दिसत आहेत.
अखेर काही वेळाने हा सगळा थरार थांबतो आणि महिला आपली सुटका करण्यात यशस्वी होते. पण या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोक प्रशासनाकडे कारवाई करण्याची मागणी करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा नोएडामधील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा उपस्थित झाला आहे.
गेल्या महिन्यात याच सोसायटीत एका मोलकरणीवर हल्ला झाला होता. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नोएडा प्राधिकरणाने नवीन श्वान धोरण लागू केलं होतं. मात्र, अशा घटना अद्यापही सुरु आहेत.