C section delivery Viral Video : आई... या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोन शब्दांचा उल्लेख केला जातो. शालेय जीवनापासून ही फोड प्रत्येकाच्याच मनात घर करून राहिली आहे. अशा या आईचं प्रत्येक रुप हे नि:स्वार्थी असतं. जेव्हाजेव्हा बाळाचा प्रश्न येतो, तेव्हातेव्हा अगदी संकटाच्या प्रसंगीसुद्धा बाळाला मायेच्या पदराखासी सुरक्षित ठेवत ही माय स्वत: संकटांना सामोरी जाते. अशा या आईचं एक सुरेख आणि तितकंच भावनिक रुप काही दिवसांपूर्वी इंटरनेटच्या माध्यमातून समोर आलं.
सोशल मीडियावर व्हायरल होणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ कित्येकदा असे काही मनात घर करतात, की ते पाहताना नकळत डोळे पाणावतात किंवा मनात भावनांची कालवाकालव होते. असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला आहे.
अनेकांनी या व्हिडीओला 'निस्सिम प्रेमाचं उदाहरण...' असंही म्हटलं आहे. हा व्हिडीओ आहे ऑपरेशन थिएटरमध्ये असणाऱ्या एका महिलेच्या सी सेक्शन प्रसूतीदरम्यानचा. बाळाला जन्म देणारी ही महिला तिच्या सी सेक्शन डिलीव्हरीदरम्यान श्रीकृष्णाच्या नावाचा धावा करत सुरेल स्वरात एक भजन गाताना दिसत आहे.
'श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा...' असं हे भजन अतिशय सुरेल आवाजात गात असतानाच या महिलेला जणू तिच्या वेदनांनचा, मनातील भीतीचा विसर पडला असून, तिला फक्त आणि फक्त बाळालाच भेटण्याची इच्छा असल्याचा आर्त भाव व्यक्त होत आहे. शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेनं स्वत:वर ठेवलेला ताबा, तिची शांत मुद्रा आणि धैर्य पाहून तिथं असणाऱ्या डॉक्टरांनाही तिचं प्रचंड कौतुक वाटत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
“A Moment of goosebumps”
— Fenil Kothari (@fenilkothari) June 19, 2024
She literally prayed to give eternal life to the baby pic.twitter.com/ViPOSuaffS
सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करण्यात, आला असून, अनेक नेटकरी तो वारंवार पाहत आहेत. तर, काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या निमित्तानं मातृत्त्वाप्रती आदराची भावना व्यक्त केली आहे. आई नकळतच तिच्या लेकरांसाठी खूप काही करत असते. अशा या 'आई'पणाला सलाम!!!