Mumbai-Ahmedabad Bullet Train Corridor: देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. अलीकडेच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अहमदाबाद येथील साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हबमध्ये तयार होणाऱ्या बुलेट ट्रेन टर्मिनलचा व्हिडिओ एक्स (ट्विटर)वर शेअर केला आहे. भारताची पहिली बुलेट ट्रेन 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत देशाची संस्कृतीसोबतच आधुनिक वास्तुशास्त्राचीही झलक पाहायला मिळतेच. अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचे टर्मिनल. साबरमती मल्टीमॉडल ट्रान्सपोर्ट हब, अहमदाबाद याची एक झलक पाहा.
व्हिडिओनुसार, पहिल्या बुलेट ट्रेनच्या टर्मिनल विविध सुविधांनी सज्ज आहे. विमानतळालाही मागे टाकेल असं सुंदर रचना करण्यात आली आहे. विमानतळाप्रमाणेच झगमगाट आणि लाउंजची सुविधा पाहायला मिळतेय. त्याचबरोबर वाहनं येण्या-जाण्यासाठी रस्तादेखील बनवण्यात येणार आहे. इथेच बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, बीआरटीएस, भारतीय रेल्वे सर्व एकाच ठिकाणी असणार आहे. यामुळं प्रवाशांचा प्रवास सोप्पा होणार आहे.
2017मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासोबत मिळून या प्रकल्पाचे भूमीपूजन केले होते. बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे 508 किलोमीटरचे अंतर ताशी 320 किलोमीटरच्या सरासरीने कापेल. या ट्रेनचा कमाल वेग ताशी 350 किमी असू शकतो. या प्रकल्पासाठी जवळपास 1 लाख 8 हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. यातील 81 टक्के रक्कम जपानकडून कर्जाऊ घेण्यात आली आहे. तसंच, हे कर्ज कंपनीकडून 0.1 टक्के प्रती वर्ष भारताकडून परत घेणार आहे.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) मुंबई-अहमादाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे निर्माण करत आहेत. या मार्गावरील 100 किलोमीटर पुल आणि 230 पायलिंगचे (समुद्राचा भाग) काम झाले आहे. एनएचएसआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 250 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.
Terminal for India's first bullet train!
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) December 7, 2023
Sabarmati multimodal transport hub, Ahmedabad pic.twitter.com/HGeoBETz9x
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन पाण्याखालून धावणार आहे. बुलेट प्रकल्पाच्या मुंबई विभागात बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किमीच्या भुयारी मार्ग असून या ७ किमी खाडीखालील बुलेट मार्गाचा समावेश आहे.