Marathi News> भारत
Advertisement

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं? दुपारी 1 ते 4.30 मध्ये नेमकं काय घडलं? वाचा Inside स्टोरी

देशातील सध्या राजकीय खळबळ उडाली आहे. जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. आता त्यांनी खरंच प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला की यामागे काही राजकीय कारणं होती याची चर्चा रंगली आहे.   

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं? दुपारी 1 ते 4.30 मध्ये नेमकं काय घडलं? वाचा Inside स्टोरी

देशाच्या राजकारणात सध्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे. जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्यामुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं असलं तरी, अनेकांना हे कारण पटलेलं नसून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 

अचानक राजीनामा का? 

अधिवेशन सुरु असतानाच जगदीप धनखड यांनी राजीनामा का दिला हा सर्वात मोठा प्रश्न आहे. 23 जुलैला उपराष्ट्रपतींचा जयपूर दौरा प्रस्तावित होता, तर मग रात्री त्यांनी राजीनामा का दिला? प्रकृती हे फक्त एक कारण होतं का? जर उपराष्ट्रपतींची तब्येत ठीक नव्हती, तर मग त्यांनी पावसाळी अधिवेशनाचं कामकाज कसं केलं? भाजपा जगदीप धनखड यांच्यावर नाराज  होती का? ते विरोधकांच्या अधिक निकट जात होते का? त्यांनी स्वत: राजीनामा दिला की देण्यास भाग पाडलं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

राष्ट्रपतींनी मंजूर केला राजीनामा

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला. गृह मंत्रालयाने त्यांची राजपत्रित अधिसूचनाही जारी केली आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांनीच राज्यसभेचं कामकाज सुरू केले. धनखड यांनी सभागृहाच्या कामकाजात भाग घेतला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'एक्स' वर पोस्ट करत त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या.

जयराम रमेश यांच्या पोस्टमधून इशारा

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामधून संपर्ण घटनाक्रम समजून घेण्यात मदत मिळत आहे. त्यांनी लिहिलं आहे की, "काल दुपारी 12.30 वाजता जगदीप धनखड यांनी राज्यसभेच्या व्यवसाय सल्लागार समितीचे (BAC) अध्यक्षपद भूषवले. या बैठकीत जेपी नड्डा आणि किरेन रिजिजू यांच्यासह बहुतेक सदस्य उपस्थित होते. दुपारी 4.30 वाजता पुन्हा बैठक झाली, परंतु जेपी नड्डा आणि रिजिजू आले नाहीत. यावरून हे स्पष्ट होतं की दुपारी 1 ते 4.30 च्या दरम्यान काहीतरी गंभीर घडले, ज्यामुळे ते अनुपस्थित होते". जयराम रमेश यांनी राजीनामा धनखड यांच्याबद्दल बरंच काही सांगतो आणि त्यांना उपराष्ट्रपतीपदी आणणाऱ्यांच्या हेतूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो असंही म्हटलं आहे.

राज्यसभेतील कामकाजावरुन वाद

त्या दिवशीच्या राज्यसभेच्या कामकाजावर नजर टाकल्यास सकाळी 11.35 वाजता वाद सुरू झाला, जेव्हा मल्लिकार्जुन खरगे यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. विरोधक सतत गोंधळ घालत होते. खरगे यांनी दहशतवादी पकडले गेले नाहीत, अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी केली अशी विधानं केली. या दरम्यान, सरकारकडून सतत हस्तक्षेप होत होता, परंतु धनखड यांनी जेपी नड्डा यांना बोलण्याची संधी दिली नाही. सुमारे 4 मिनिटांनंतर नड्डा यांना बोलण्याची संधी मिळाली. त्यानंतर विरोधी खासदारांनी गोंधळ घातला. नड्डा म्हणाले की मी जे बोलतो तेच रेकॉर्डवर राहील. त्यांनी ही टिप्पणी अध्यक्षांकडे नाही तर विरोधी पक्षाकडे केली.

महाभियोग प्रस्ताव

राजीनाम्याचं हे एकमेव कारण असू शकत नाही. यानंतर जे झालं त्यामुळे सरकार अस्वस्थ झालं. काल दुपारी 4.07 वाजता, अध्यक्ष जगदीप धनखड यांनी न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्धच्या महाभियोग प्रस्तावावर 63 विरोधी खासदारांकडून नोटिसा मिळाल्याची माहिती दिली. त्यांनी यासंबंधीच्या नियमांचा हवाला दिला आणि लोकसभेतही हाच प्रस्ताव आणला गेला आहे का? असा प्रश्न विचारला. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्ष आणि भाजप खासदारांकडून नोटिसा मिळाल्या आहेत असं उत्तर दिलं. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर, राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात भाजप राज्यसभा खासदारांची बैठक झाली. त्यांना एका कागदावर स्वाक्षरी करायला लावण्यात आली. त्यांना स्वाक्षरी कशासाठी आहे हे सांगितलं नाही. असं म्हटलं जातं की सरकारला या महाभियोग प्रस्तावाची माहिती नव्हती. सरकारसाठी हा खूप लाजिरवाणा क्षण होता. कदाचित म्हणूनच जेपी नड्डा आणि किरण रिजिजू बीएसीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आणि त्यानंतर धनखड यांनी राजीनामा दिला.

Read More