Yogi Adityanath: उत्तर प्रदेशात मुस्लिम समुदाय अधिक सुरक्षित असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. न्यूज एजन्सी ANI ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना वक्फ बोर्ड आणि औरंगजेब यासारख्या मुद्द्यांवरही प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर, अन्य राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशात मुसलमान अधिक सुरक्षित आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे की, 'यूपीमध्ये मुस्लिम सर्वात जास्त सुरक्षित आहेत. इतर राज्यांच्या तुलनेने मुस्लिम कुठेच सुरक्षित नाहीत. जर हिंदू सुरक्षित राहतील तर मुस्लिमदेखील सुरक्षित राहतील. 100 मुस्लिम कुटुंब असलेल्या परिसरात 1 हिंदू. 1 हिंदू सोडाच 50 हिंदू कुटुंब सुरक्षित राहू शकत नाही. मात्र 100 हिंदू कुटुंब असलेल्या परिसरात 1 मुस्लिम कुटुंब सुरक्षित राहिल. ते आरामात त्यांचा धर्म जपू शकतात,' असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
'50 हिंदू कुटुंब 100 मुस्लिम कुटुंब असलेल्या परिसरात सुरक्षित राहू शकते का? तर नाही. बांगलादेश हे त्याचे उदाहरण आहे. त्याआधी पाकिस्तानचेच उदाहरण घ्या. बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार मागीच वर्षी ऑगस्टमध्ये कोसळले होते. तेव्हा हिंदूंवर आणि तिथील पूजाऱ्यांवर हल्ले करण्यात आले. अल्पसंख्याक हिंदूंच्या घरात चोरी करण्यात आली. 150 मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली,' असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी पुढे म्हटलं की, 'सरकारला सत्तेत येऊन 8 वर्षे झाली. भाजप सरकार 2017 रोजी सत्तेत आलं त्यानंतर राज्यातील दंगली पूर्णपणे थांबल्या. उत्तर प्रदेशात मुस्लिम सुरक्षित आहेत. जर हिंदू सुरक्षित आहेत तर ते देखील सुरक्षितच आहेत. जर 2017 पूर्वी उत्तर प्रदेशात दंगली झाल्या असतील, तेव्हा हिंदूंची दुकाने जळत असतील, तर मुस्लिमांची दुकानेही जळत होती. जर हिंदूंची घरे जळत असतील, तर मुस्लिमांची घरेही जळत होती. पण 2017 नंतर दंगली थांबल्या,' असे ते म्हणाले.