How Eyeliner Habits May Be Harming Your Eye: आयलायनर हा रोज केल्या जाणाऱ्या मेकअप रूटिनचा महत्त्वाचा भाग असतो. आजकाल काळा, हिरवा, पांढरा अशा वेगवेगळ्या रंगांचे आयलायनर्स वापरले जातात. हे आयलायनर्स जेल, पावडर, पेन्सिल अशा वेगवेगळ्या स्वरूपात येतात. प्रत्येकाच्या आवडीचा प्रकार आणि ब्रँडही वेगळा असतो. मात्र, सौंदर्य हा मुद्दा बाजूला ठेवून डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास आयलायनर्समुळे बरीच इजा होऊ शकते. चला याबद्दल डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटल, पिंपरी चिंचवडचे एमबीबीएस डीआयपी (ऑप्थल), डीएनबी (ऑप्थल) मेडिकल रेटिना डॉ. सोनल अशोक एरोले यांच्याकडुन अधिक माहिती जाणून घेऊयात.
पापण्यांचा संसर्ग
आयलाइनर बहुतेक वेळेस वॉटरशेड लाइनजवळ लावला जातो, जिथे पापण्यांमधील तैलग्रंथी खुल्या असतात. आयलायनर्समधील कणांमुळे या ग्रंथी साचून डोळ्यांना सूज येण्याची शक्यता असते. पर्यायाने पापण्यांचा संसर्ग उदा. stye, chalazion आणि अगदी blepharitis होण्याची शक्यता असते.
अॅलर्जिक कंजक्टिव्हायटिस
त्याचप्रमाणे या उत्पादनांमध्ये पॅराबीन आणि इतर रसायने असण्याची शक्यता असते, जी डोळ्याच्या पारदर्शक आवरणाच्या म्हणजे कंजक्टिव्हायलच्या संपर्कात आल्यानंतर डोळ्याला संसर्ग होऊ शकतो. या संसर्गामुळे डोळे लाल होतात, त्यातून पाणी यायला लागतं आणि डोळ्यांना खाज येते.
कॉर्नियल अब्रेशन आणि संसर्ग
आयलायनरमधील कणांमुळे डोळ्यातील पारदर्शक भाग म्हणजेच कॉर्नियाला घर्षण किंवा दुखापत होते. या घर्षणामुळे खूप वेदना होतात, डोळ्यातून पाणी येते आणि पापण्या उघडणे वेदनादायी होते.
डोळ्यांचा संसर्ग
अॅलर्जी, सूक्ष्म आघातआणि घर्षणामुळे डोळ्यातील कन्जक्टिव्हा आणि कॉर्नियासारख्या संवेदनशील भागांना व्हायरल किंवा बॅक्टेरियल कंजक्टिव्हायटिससारखे संसर्ग होतात. कधी कधी आयलायनरमधील संसर्गजन्य कणांमुळे अल्सर होऊ शकतो व तो फंगल असू शकतो.
कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असल्यास
आयलायनर कॉन्टॅक्ट लेन्सवर लावल्यास त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स खराब होतात व त्यांनाही विषाणू आणि सूक्ष्मजंतूंची लागण होते.
काय काळजी घेतली पाहिजे?
1) आयलायनर पापण्यांच्या वॉटरशेड लाइनपासून दूर लावा.
2) विश्वासार्ह आणि कमीत कमी अॅलर्जीची शक्यता असलेले ब्रँड्स वापरा. आयलायनरची निवड काळजीपूर्वक करा. डोळ्यांत लालसरपणा दिसल्यास किंवा पाणी येत असल्यास नेत्ररोगतज्ज्ञांना भेटा आणि आयलायनर बदला.
3) जेल किंवा क्रीम बेस्ड आयलायनर वापरा, कारण त्यांचे कण सुटे होऊन सूक्ष्म आघात करण्याची शक्यता कमी असते.
4) एक्सपायरी डेट तपासा आणि प्रत्येक वेळेस आयलायनर लावल्यानंतर एंड्स स्वच्छ करा.
5) कॉन्टॅक्ट लेन्सेस घातले असताना आयलायनर लावायचे असल्यास योग्य काळजी घ्या. लेन्सेस घालण्यापूर्वी आणि काढल्यानंतर स्वच्छ धुवा.
6) वारंवार डोळ्यांत वेदना, पाणी येणं, लालसरपणा अशा समस्या आल्यास नेत्ररोगतज्ज्ञांना भेटा.
एकंदरीत आयलायनर वापरून डोळ्यांची सुंदरता वाढवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या...