कामावर जाताय, पण स्वयंपाकघरही तुमच्याच ताब्यात आहे? रोज सकाळी घाईच्या वेळेत भाजीसाठी ग्रेवी करणं खूप वेळखाऊ वाटतंय का? मग सोशल मीडियावर फूड इन्फ्लुएंसर म्हणून ओळखली जाणारी इशिता मेहता यांची एकी भन्नाट ट्रिक तुमच्यासाठी खुप फायदेशीर आहे. इन्फ्लुएंसर इशिता मेहताने शेअर केलेली 'ग्रेवी क्यूब्स' रेसिपी एकदा करून ठेवली की पुढचे 2 महिने तुम्हाला रोज भाजीसाठी वेगळी ग्रेवी बनवण्याची गरज भासणार नाही. फक्त पाण्यात घाला, उकळा आणि 2 मिनिटांत भाजीची ग्रेवी तयार! चला जाणून घेऊयात कसे बनवायचे हे 'ग्रेवी क्यूब्स'...
मोहरीचं तेल
खडे मसाले – तेजपत्ता, काळी मिरी, वेलदोडा
किसलेलं आलं आणि लसूण
बारीक चिरलेला कांदा
चिरलेला टोमॅटो
काजू (ऐच्छिक)
जिरे, हळद, धणे पावडर, लाल तिखट
कसुरी मेथी
एका कढईत मोहरीचं तेल गरम करून त्यात खडे मसाले टाका.
नंतर आलं, लसूण आणि कांदा घालून ते सोनेरी होईपर्यंत परतवा.
कांदा भाजल्यानंतर टोमॅटो आणि काजू टाकून 10-15 मिनिटं झाकून शिजवा.
हे मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमध्ये गुळगुळीत वाटून घ्या.
दुसऱ्या कढईत थोडं तेल गरम करून त्यात जिरे, हळद, धणे पावडर, लाल तिखट टाका.
मग त्यात मिक्सरमधलं ग्रेवी पेस्ट टाका.
मध्यम आचेवर 10-15 मिनिटं शिजवा. शेवटी कसुरी मेथी टाका आणि गडद ग्रेवी होईपर्यंत परता.
पूर्ण गार झाल्यावर हे मिश्रण आइस क्यूब ट्रेमध्ये भरून फ्रीज करा.
हवं असल्यास झिप लॉक बॅगमध्ये स्टोअर करा.
जेव्हा भाजी बनवायची असेल, तेव्हा गरजेनुसार ग्रेवी क्यूब्स घ्या, पाण्यात टाका आणि 2-3 मिनिटं उकळा. तुमची रेस्टॉरंट स्टाइल भाजीची ग्रेवी तयार आहे!
ही ट्रिक ऑफिस, घर आणि स्वयंपाक यांचा मेळ घालणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. झटपट, चविष्ट आणि साठवून ठेवण्यास योग्य अशी ही ग्रेवी क्यूब्स रेसिपी नक्की करून बघा.