Marathi News> Lifestyle
Advertisement

थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

Varanfal Recipe: पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम  वरणफळ खाण्याची मजा काही औरच असते. ही रेसिपी सोपी असून पोटभरीची आणि आरोग्यदायीही आहे.   

थंडगार पावसाळी वातावरणात बनवा स्वादिष्ट वरणफळ! जाणून घ्या मराठमोळी Recipe

How to Make Chakolya / Varanfal Recipe:  वरणफळ ही महाराष्ट्रातल्या अनेक घरांमध्ये तयार होणारी पारंपरिक, पौष्टिक आणि अतिशय चवदार डिश आहे. ही डिश म्हणजे गोडसर, तिखटसर तूर डाळीच्या वरणात शिजवलेले गव्हाच्या पिठाचे तुकडे. याला वेगवगेळी नावंही आहेत. याला कोणी ढोकळी (dal dhokli) म्हणतं तर कोणी चकोल्या म्हणतात. मराठी चव आणि पद्धतीनुसार बनवलेली ही डिश तुम्ही कधीही खाऊ शकता. गूळ-चिंच घालून तयार केलेलं खमंग वरण आणि त्यात मऊ, स्वादिष्ट चकोल्या घालून शिजवलेली ही डिश सूपसारखी खाल्ली जाते, किंवा गरम गरम भातासोबतही दिली जाते. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम  वरणफळ खाण्याची मजा काही औरच असते. ही रेसिपी सोपी असून पोटभरीची आणि आरोग्यदायीही आहे. चला तर मग, पाहूया ही स्वादिष्ट  वरणफळ कसे बनवायचे. 

लागणारे साहित्य 

वरनासाठी (तूर डाळीचं वरण):
तूर डाळ – 1 कप

पाणी – 3 कप

हळद – ¼ टीस्पून

मीठ – चवीनुसार

गूळ – 1 टेबलस्पून

चिंच – 1 टीस्पून (कोमट पाण्यात भिजवून गाळलेली)

हिरव्या मिरच्या – 2 (चिरलेल्या)

आलं – 1 टीस्पून (बारीक किसलेलं)

हिंग – 1 चिमूट

मोहरी – ½ टीस्पून

जिरे – ½ टीस्पून

कढीपत्ता – 7-8 पाने

तेल/तुप – 2 टेबलस्पून

कोथिंबीर – सजावटीसाठी

वरनाफळासाठी साहित्य (चकोल्या):
गव्हाचं पीठ – 1 कप

हळद – ¼ टीस्पून

तिखट – ½ टीस्पून

मीठ – ¼ टीस्पून

ओवा – ¼ टीस्पून

तेल – 1 टेबलस्पून

पाणी – लागेल तसं

कृती 

१.  वरणतयार करणं:
तूर डाळ धुवून कुकरमध्ये हळद, 3 कप पाणी घालून 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.

डाळ थंड झाल्यावर चांगली घोटून घ्या किंवा मिक्सरमध्ये गुळगुळीत करा.

एका कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, आलं, हिरव्या मिरच्या घाला.

फोडणी सुटली की त्यात डाळ घालून पातळ करून घ्या. त्यात मीठ, गूळ आणि चिंच पाणी घालून उकळा.

२.  वरणफळासाठी पीठ:
एका बाऊलमध्ये गव्हाचं पीठ, हळद, मीठ, तिखट, ओवा आणि तेल टाकून मळायला सुरुवात करा.

थोडंसं पाणी घालून मध्यम सैलसर पीठ भिजवा.

पीठ 10 मिनिटं झाकून ठेवा.

पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्याचे पातळ लाटून त्रिकोणी, चौकोनी किंवा डायमंड शेपमध्ये  वरणफळ कापा.

३. शेवटच्या स्टेप्स 
उकळत असलेल्या डाळीत एकेक करून तयार  वरणफळ सोडा.

सगळे  वरणफळ डाळीत घालून मंद आचेवर 10-12 मिनिटं झाकण ठेवून शिजू द्या. मधूनमधून हलवत राहा, नाहीतर  वरणफळ चिकटतात.

एकदा  वरणफळ चांगले शिजले की गॅस बंद करा.

वरून कोथिंबीर आणि तूप टाकून गरम गरम सर्व्ह करा.

सोबत लिंबू, लोणचं किंवा थोडासा दही छान लागतं.

Read More