Marathi News> Lifestyle
Advertisement

घरच्या घरी बनवा नैसर्गिक हेअर मिस्ट; केसांना द्या नवी चमक...

केस धुतल्यानंतरही काही वेळांनी त्यातून कुबट किंवा घामाची दुर्गंधी येऊ शकते. ही समस्या अनेक महिलांना भेडसावते, विशेषतः उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात. अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी त्यावर उपाय करु शकतात. 

घरच्या घरी बनवा नैसर्गिक हेअर मिस्ट; केसांना द्या नवी चमक...

Hair Mist At Home: बाजारात मिळणाऱ्या हेअर मिस्ट किंवा हेअर परफ्यूमचा वापर केला जातो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांमध्ये अनेक वेळा केमिकल्स असतात जे केसांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकतात. त्यामुळेच घरच्या घरी नैसर्गिक घटक वापरून हेअर मिस्ट तयार करणे हा एक उत्तम पर्याय ठरतो. हे घरगुती हेअर मिस्ट तुमच्या केसांना नुसता सुगंधच देत नाही तर त्यांना मॉइश्चराइज देखील करतात आणि केस अधिक मऊ, चमकदार आणि ताजेतवाने वाटू लागतात. पाहूयात काही सोपे आणि प्रभावी नैसर्गिक हेअर मिस्ट तयार करण्याचे प्रकार.

1. गुलाब मिस्ट (Rose Hair Mist)
साहित्य:
1/2 कप गुलाबजल (Rose Water), 1 चमचा ग्लिसरिन, काही ताज्या गुलाबाच्या पाकळ्या, स्प्रे बॉटल

कृती:
गुलाबजलात गुलाबाच्या पाकळ्या मिसळा आणि त्यात ग्लिसरिन घालून चांगले हलवा. हे तयार मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. अंघोळीनंतर किंवा केस धुतल्यानंतर केसांवर हलक्या हाताने स्प्रे करा.

फायदे:
गुलाबजल केसांना थंडावा देते, तर ग्लिसरिन केसांना मॉइश्चराइज करते. या मिस्टमुळे केसांना सौम्य आणि ताजातवाना सुगंध येतो.

2. कॉफी हेअर मिस्ट (Coffee Hair Mist)
साहित्य: 
1 कप पाण्यात उकळवलेली कॉफी, 1 चमचा खोबऱ्याचे तेल, स्प्रे बॉटल

कृती:
कॉफी थंड झाल्यावर त्यात खोबऱ्याचे तेल मिसळा आणि मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये ओता. केस धुतल्यानंतर किंवा बाहेर जाताना केसांवर हलकासा स्प्रे करा.

फायदे:
कॉफी केसांना नैसर्गिक चमक देते. तसेच केसांच्या रंगात थोडा गडदपणा आणते. यामुळे केस घनदाट आणि निरोगी दिसतात.

 3. इसेंशियल ऑईल मिस्ट (Essential Oil Mist)
साहित्य: 
1/2 कप डिस्टिल्ड वॉटर,  8-10 थेंब लॅव्हेंडर, टी ट्री किंवा रोजमेरी इसेंशियल ऑईल, स्प्रे बॉटल

कृती:
सर्व घटक एकत्र करून चांगले हलवा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. केसांवर रोजच्या रोज हलक्या प्रमाणात वापरू शकता.

फायदे:
इसेंशियल ऑईल्स केसांमधील खाज, डँड्रफ आणि दुर्गंधी दूर करण्यास मदत करतात. लॅव्हेंडर शांतता देते, टी ट्री स्कॅल्पवरील बॅक्टेरिया नष्ट करते आणि रोजमेरी केसांची वाढ सुधारते.

वापरण्याच्या टिप्स:
1.मिस्ट बनवल्यानंतर ते 1-2 आठवड्यांत संपवण्याचा प्रयत्न करा.
2.हेअर मिस्ट थेट केसांच्या मुळांवर न फवारता थोडक्याच अंतरावरून केसांवर वापरा.

घरच्या घरी बनवलेले हेअर मिस्ट हे केवळ सुरक्षितच नाही तर परिणामकारक देखील आहेत. नैसर्गिक घटक वापरल्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते आणि कोणतेही साईड इफेक्ट्स होण्याची शक्यता राहत नाही. हे मिस्ट तुम्ही कपड्यांवर किंवा त्वचेवर देखील वापरु शकतात. कारण यात सगळ्या नैसर्गिक घटकांमुळे त्वचेला कोणताही त्रास होत नाही. 

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More