Secret Of Rs 4 Crore 70 Lakh Savings Retire At Age Of 45: पैशाने पैसा वाढतो, असं म्हटलं जातं. पैसे वाढवण्यासाठी केवळ गुंतवणूक करुन भागत नाही तर ती गुंतवणूक स्मार्ट असली पाहिजे. त्यामुळेच मोठ्या पगाराच्या नोकरीबरोबरच स्मार्ट गुंतवणुकीची जाण असणं गरजेचं असतं. अशीच एक स्मार्ट गुंतवणुकीचं महत्त्व पटवून देणारी एक पोस्ट रेडइट या सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरल होत आहे. स्टॉक मार्केट नावाच्या अकाऊंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमधील आकडेवारी पाहून अनेकजण थक्क झालेत.
या पोस्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार एक व्यक्ती 45 व्या वर्षी निवृत्त झाला असून त्याच्याकडे सेव्हिंग्स म्हणजेच बचत केलेले तब्बल 4 कोटी 70 लाख रुपये निवृत्तीच्या वेळी शिल्लक असल्याचं म्हटलंय. विशेष म्हणजे या व्यक्तीला भरमसाठ पगार असलेली नोकरी नव्हती. तो उद्योजकही नव्हता किंवा तो शेअर बाजारात ट्रेडिंगही करत नव्हता. सामान्यपणे पैसा गोळा करण्यासाठी जे लोकप्रिय मार्ग आहे त्यापैकी एकाचीही निवड न करता या व्यक्तीकडे 45 व्या वर्षी निवृत्ती घेताना एवढा पैसा जमला कसा असा प्रश्न अनेकांना पडलाय.
'तो वयाच्या 45 व्या वर्षी 4.7 कोटी रुपयांसहीत निवृत्त झाला', अशा मथळ्याखाली या बचतीच्या मागील गुपित सांगण्यात आलं आहे. निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या पुतण्याने त्याच्या काकाने एवढा पैसा कसा वाचवला हे पोस्टमधून सांगितलं आहे. माझ्या काकाने सातत्याने आणि फार आधीपासून गुंतवणूक सुरु केल्याचं या मुलाने सांगितलं आहे. "माझ्या काकांकडे कोणतीही मोठ्या पगराची नोकरी नव्हती. त्यांनी कधी व्यवसाय केला नाही. ते शेअर ट्रेडिंगमध्येही नव्हते. केवळ सध्या बोरिंग वाटेल अशी नोकरी केली. त्यामधूनच त्यांना पगार मिळत गेला," असं या तरुणाने म्हटलंय. काकांकडे एवढा पैसा निवृत्तीला शिल्लक राहण्यामागे कारण ठरलं ते आर्थिक शिस्त!
ही गुंतवणुकीची गोष्ट सुरु झाली ती 1998 पासून, आजूबाजूच्या लोकांना म्युच्युअल फंड काय असतं याची माहितीही नव्हती तेव्हापासून या व्यक्तीने गुंतवणूक केली. त्यावेळी पैशाचं मूल्य अधिक होतं. तेव्हा 10 हजार रुपये ही खूप मोठी रक्कम होती. मात्र या व्यक्तीने इतकीच रक्कम नियमितपणे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यांनी 500 रुपयांच्या एसआयपीपासून सुरुवात केली. एसआयपी म्हणजेच सिस्टीमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन! पगार वाढला तशी एसआयपीची रक्कमही वाढवत नेली. 2010 उजाडेपर्यंत ही व्यक्ती महिन्याला 20 हजार रुपये बाजूला काढत होती. नियमितपणे ही व्यक्ती महिन्याला ही रक्कम बाजूला काढत राहिली आणि त्याने यात सातत्य राखलं, असं पोस्टमध्ये म्हटलंय.
या गुंतवणुकीतून काय मिळालं असं पोस्ट लिहिणाऱ्या पुतण्याने विचारलं तेव्हा त्याच्या काकाने त्याला पासबुक दाखवलं. त्यामध्ये या व्यक्तीच्या नावावर 4 कोटी 70 लाख रुपये होते, असं दिसत असल्याचा उल्लेखही पोस्टमध्ये आहे. आपल्या काकाच्या या निर्णयाचं कौतुक करताना, "खऱ्या अर्थाने पहिल्यास काक ज्या पद्धतीने जगले त्यातूनच ते इतरांपासून वेगळे ठरले. त्यांनी महागडी घरं, गाड्या विकत घेतल्या नाहीत. ते फक्त एखदा केरळ फिरायला गेलेले. ते 30 वर्ष एकाच 2 बीएचके फ्लॅटमध्ये राहिले. इतक्या वर्ष फक्त स्कूटर चालवली. आता निवृत्तीच्या काळात ते आणि त्यांची पत्नी सतत प्रवास करतात. दर विकेण्डला ते फिरतात," असं या व्यक्तीने म्हटलं आहे.
विशेष म्हणजे या व्यक्तीच्या मुलांना त्याच्या या संपत्तीबद्दल काहीच कल्पना नाही. आयुष्यात कोणताही व्यवहारिक सल्ला आवश्यक असेल तर मी त्यांच्याकडेच जातो. मला पैशांसंदर्भातील सर्वात महत्त्वाची आणि जवळची प्रेरणा देणारी व्यक्ती तेच आहेत, असं या तरुणाने पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे.
या पोस्टखाली अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या असून बऱ्याचजणांनी वेळीच गुंतवणूक सुरु करण्याचं महत्त्व यामधून समजतं असं म्हटलं. अनेकांनी आयुष्यात लवकर गुंतवणूक करणे चांगले असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी हे काका त्यांचं आयुष्य रटाळपणे जगले असं म्हटलंय.