Peeled or Unpeeled How To Eat Cucumber: उन्हाळ्यामध्ये आवर्जून खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये काकडीचा आवर्जून समावेश होतो. कलिंगड, आंबा याबरोबरच काकडी खाण्याचं प्रमाणही उन्हाळ्यामध्ये वाढल्याचं दिसून येतं. डिहायड्रेशन टाळण्यासाठी आणि पोटभरीचं म्हणून काकडी हा अगदी स्वस्तात मस्त पर्याय आहे. मात्र अनेकदा आपण एखादी गोष्ट खाताना ती साळून खातो. काकडीही साळून खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. मात्र यामुळेच काकडी साळून खाणं चांगलं की सालासकट यावरुन बऱ्याचदा एकाच घरात दुमत असलेलं दिसतं.
खरं तर आपण अनेक फळं आणि भाज्या साळून खातो. मात्र त्यामुळे या भाज्यांमधील महत्त्वाचे घटक आपण या सालांसकट गमावतो. असाच काहीसा प्रकार काकडीबाबत होतो असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. काकडीमध्ये फायबर, पोषक तत्वं आणि अँटीऑक्सीडंट मोठ्या प्रमाणात असतात. मात्र यापैकी बहुतांश घटक हे काकडी सालून खाल्ल्यास शरीरात पोहचत नाही. 'वेबएमडी'ने दिलेल्या माहितीनुसार, काकडी न साळता खाल्ल्यास अधिक पोषक तत्वं शरीराला मिळून त्याचा अधिक फायदा होऊ शकतो. अर्थात काकडी न साळता खाणार असाल तर ती खाण्याआधी स्वच्छ धुवून घेणं आवश्यक असतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
ग्राहकांना काकडी अधिक फ्रेश आणि चकाकती दिसावी म्हणून तिच्यावर अनैसर्गिक किंवा कृत्रिम सिंथेटीक वॅक्स म्हणजेच मेण लावलं जातं. हे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळेच काकडी स्वच्छ धुण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या कोमट पाण्यात धुवाव्यात. मात्र स्वच्छतेच्या नावाखाली काकडीची सालं काढून खाणं हा फारसा शहाणपणाचा निर्णय ठरत नाही. कारण सालींबरोबर काकडीमधील बरीचशी पोषक तत्व निघून जातात.
> काकडीमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवण्यास म्हणजेच शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते.
> काकडीमधील फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास टाळता येते. काकडीच्या सेवनामुळे पचनसंस्था सुधारते.
> काकडीमधील हेच फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
> काकडीमध्ये कॅलरी, फॅट, कोलेस्ट्रॉल आणि सोडिअम इत्यादीचे प्रमाण कमी असते.
> काकडीमध्ये असलेले जीवनसत्व के रक्त गोठण्यास मदत करते आणि हाडं निरोगी ठेवतं.
> काकडीमध्ये असलेले अ जीवनसत्वं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.
> काकडीमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
> काकडीमधील सीयबी नावाचे तत्व हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याला दुजोरा देत नाही.)