Side Effects of Eating Biscuits: चहा म्हटलं की बिस्किट हवंच, असं आपल्या अनेकांचं ठरलेलं असतं. दोन का असेना बिस्कीट हवेच असतात. सकाळ असो वा संध्याकाळ, चहा घेताना दोन-चार बिस्किटं नकळतच संपून जातात. पण हीच सवय तुमचं शरीर आतून हळूहळू कमजोर करू शकते, हे तुम्हाला माहितेय का?
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच बिस्किटं खायला आवडतात. कुरकुरीत, गोडसर चव कोणालाही आकर्षित करते. पण ही चव तुमच्या आरोग्यावर ‘गोड विष’सारखी परिणाम करू शकते. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की सतत बिस्किटं खाल्ल्यामुळे मेटाबॉलिझमचा वेग कमी होतो. परिणामी पचनशक्ती बिघडते आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे वाढलेलं वजन, वाढलेला शुगर लेव्हल आणि पचनाच्या तक्रारी.
बहुतेक बिस्किटं मैदा, रिफाइन्ड साखर आणि हायड्रोजनेटेड तेल वापरून बनवली जातात. या सर्व गोष्टी आरोग्यासाठी घातक मानल्या जातात. यामध्ये फायबर कमी असतो, त्यामुळे हे पचायला जड पडतात. याचा थेट परिणाम म्हणजे गॅस, अॅसिडिटी आणि कब्ज यांसारख्या समस्या.
बिस्किटांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. ज्यांना आधीच मधुमेह आहे, त्यांच्यासाठी ही सवय धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा लोकांनी बिस्किटांपासून शक्यतो दूर राहावं.
बिस्किटांमध्ये प्रथिने, फायबर आणि आवश्यक व्हिटॅमिन्स फार कमी प्रमाणात असतात. त्यामुळे लहान मुलांना नियमित बिस्किटं दिल्यास त्यांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो. रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते.
डायटीशियन सांगतात की बिस्किटांमध्ये लपलेल्या साखरेमुळे आणि कॅलरीजमुळे शरीरात चरबी साचते. ज्यामुळे वजन वाढतं आणि लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं. ज्या लोकांना आधीच वजनाचा त्रास आहे, त्यांनी बिस्किटं खाणं तातडीनं थांबवायला हवं. इतरांनीही याचा वापर कमीतकमी करावा. बिस्किट खाणं थोडक्यात सोपं वाटतं, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि गंभीर असू शकतात. म्हणूनच, बिस्किटांचा अतिरेक टाळा आणि आरोग्यदायी पर्याय निवडा.