Marathi News> Lifestyle
Advertisement

हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर आहेत वेगवेगळे! जाणून घ्या नेमका काय फरक आहे

Heart Attack, Cardiac Arrest, Heart Failure: अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala Death) हीचा कार्डियाक अरेस्टने मृत्यू झाला असल्याची चर्चा होत आहे. अनेकदा हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअरमध्ये यामध्ये गोंधळ होतो. या तिघांमधील फरक काय आहे ते जाणून घ्या.   

हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर आहेत वेगवेगळे! जाणून घ्या नेमका काय फरक आहे

Difference Between Heart Attack, Cardiac Arrest, Heart Failure: सध्या हृदयाच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. बातम्यांमध्ये आपण अनेकदा पाहतो. कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाचा कार्डियाक अरेस्टमुळे मृत्यू झाला, तर कुणाचे हार्ट फेल झाले. अनेकदा हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट असे शब्द सहज वापरले जातात. आपल्यापैकी बरेच जण हार्ट अटॅक, कार्डियाक अरेस्ट आणि हार्ट फेल्युअर या तिन्ही गोष्टी एकसारख्या समजतात किंवा त्यात गोंधळ करतात. नावं जरी सारखी वाटली तरी वैद्यकीय दृष्टिकोनातून या तीनही स्थिती वेगवेगळ्या आहेत. यांची कारणं, लक्षणं आणि उपचार सगळेच वेगेवगेळे असतात.चला तर मग, या सगळ्यांचा नेमका अर्थ आणि यामधला फरक आपण सोप्या भाषेत समजून घेऊ.

हार्ट अटॅक म्हणजे नेमकं काय?

हार्ट अटॅकला वैद्यकीय भाषेत मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणतात. हे तेव्हा होतं जेव्हा हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. हा अडथळा कोलेस्ट्रॉल जमा होणं किंवा रक्ताच्या गाठीमुळे होतो. महत्वाचं म्हणजे हार्ट अटॅकदरम्यान हृदयाची धडधड सुरु असते. वेळेत उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

लक्षणं:

  • छातीत दुखणं किंवा जडपणा जाणवणे 
  •  खांदा, हात किंवा गळा दुखू लागणे 
  • प्रचंड घाम येणे
  • श्वास घेण्यास त्रास
  • मळमळणे किंवा उलटी होणे

हे ही वाचा: Shefali Jariwala Net worth: 'इतक्या' कोटींची मालकीण होती शेफाली जरीवाला, एका गाण्याने बनवलं होतं स्टार

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय?

कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयाची धडधड अचानक थांबणं. हृदयाचं पंपिंग एकदम बंद होतं आणि शरीरात रक्तप्रवाह थांबतो. ही एक अतिशय गंभीर आणि जीवघेणी स्थिती असते. यामध्ये तात्काळ CPR (छातीला दाब देणे) आणि डिफिब्रिलेटरचा वापर करावा लागतो. 2-3 मिनिटांत उपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त असते.

लक्षणं:

  • अचानक बेशुद्ध होणं
  • श्वास न घेता येणे
  • नाडी थांबलेली असते
  • त्वचेचा रंग निळसर होणे 

हार्ट फेल्युअर म्हणजे काय?

हार्ट फेल्युअर म्हणजे हृदय पूर्णपणे बंद पडलं आहे, असं नव्हे. तर हृदय शरीराच्या गरजेनुसार पुरेसं रक्त पंप करू शकत नाही. ही एक क्रोनिक स्थिती असते आणि हळूहळू विकसित होते. हृदयाचे स्नायू कमकुवत होतात आणि त्यामुळे शरीराच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

लक्षणं:

  • खूप काळापर्यंत असलेला उच्च रक्तदाब
  • पूर्वी आलेल्या हार्ट अटॅकनंतर हृदय कमकुवत होणं
  • श्वास घेण्यास त्रास, विशेषतः झोपताना त्रास जास्त होणे 
  • पाय सुजणे, थकवा येणे
  • काही विशिष्ट इन्फेक्शन किंवा हृदयाचे आजार

हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय करावं?

  • दररोज किमान 30 मिनिटे चालण्याची सवय लावा. 
  • जंक फूड टाळा आणि संतुलित आहार घ्या. 
  • तणाव नियंत्रित करण्याचे उपाय शिका. 
  • रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवा. 
  • धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहा. 
  • दर सहा महिन्यांनी हृदय तपासणी करा. 
Read More