गर्भधारणेच्या काळात फॉलिक अॅसिड आणि फोलेट या दोन्ही घटकांची महत्त्वाची भूमिका असते. हे दोन्ही पोषक तत्त्व बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या योग्य विकासासाठी आवश्यक आहेत. तसेच, आईच्या शरीरातील रक्ताची कमतरता टाळण्यासाठी देखील ही तत्त्वे मदत करतात. त्यामुळे तुम्ही जर गर्भधारणेची योजना करत असाल किंवा सध्या गर्भवती असाल, तर आहारात फॉलिक अॅसिड आणि फोलेटयुक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.
फॉलिक अॅसिडचे फायदे
गर्भधारणेदरम्यान महिलांनी दररोज 400 ते 800 मायक्रोग्रॅम फॉलिक अॅसिडचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे न्यूरल ट्यूब डिफेक्ट (NTD) सारख्या गंभीर जन्मजात समस्यांचा धोका कमी करते. लाल रक्तपेशी वाढतात, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो. तसेच अॅनिमियाचा धोकाही कमी होतो. मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या विकासात मदत होते.
शरीरात फॉलिक अॅसिडची पातळी टिकवण्यासाठी आहारातील उत्तम स्रोत
1. ब्रोकोली आणि ब्रुसेल्स स्प्राउट्स
या क्रुसिफेरस भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट असते. अर्धा कप शिजवलेल्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 84 मायक्रोग्रॅम फोलेट असते. ब्रुसेल्स स्प्राउट्समध्येही अर्ध्या कपात 47 मायक्रोग्रॅम फोलेट असते.
2. शेंगा
बीन्स, मसूर, वाटाणे यासारख्या शेंगांमध्येही फोलेट मोठ्या प्रमाणात आढळते. अर्धा कप शिजवलेल्या मसूर डाळीत 179 एमसीजी, राजम्यामध्ये 115 एमसीजी, तर हिरव्या वाटाण्यात 51 एमसीजी फोलेट असते.
3. बीट
बीट हा फोलेटचा उत्तम स्रोत आहे. अर्धा कप शिजवलेल्या बीटमध्ये 67 मायक्रोग्रॅम फोलेट असते. बीटची पाने शिजवून खाल्ल्यास त्यातून अधिक फोलेट मिळते.
4. सुकामेवा आणि चिया सिड्स
काजू, बदाम, अक्रोड, चिया सिड्स, जवस यामध्ये फोलेटचे प्रमाण चांगले असते. उदा. 28 ग्रॅम अक्रोडात 28 एमसीजी, काजूत 19 एमसीजी, तर चिया सिड्समध्ये 14 एमसीजी फोलेट असते.
5. अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये निरोगी फॅट्ससोबतच फोलेट देखील मुबलक असते. एका मध्यम आकाराच्या अॅव्होकॅडोच्या एक तृतीयांश भागात सुमारे 40 मायक्रोग्रॅम फोलेट असते.
6. अंडी
अंडी हे फोलेटचा साधा पण प्रभावी स्रोत आहे. एका उकडलेल्या अंड्यात सुमारे 18 मायक्रोग्रॅम फोलेट असते. दिवसाला दोन ते तीन अंडी खाल्ल्यास आवश्यक फोलेट मिळू शकते.
7. पपई
पपई हे पचनासाठी उपयुक्त असून त्यात सुमारे 57 मायक्रोग्रॅम फोलेट असते. यात पपेन नावाचे एंझाइम असते जे पचनास मदत करते. मात्र. पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणात आणि त्याआधीच्या नियोजनाच्या काळात फॉलिक अॅसिड आणि फोलेट यांचा आहारात समावेश अत्यावश्यक आहे. नैसर्गिक आहारातून हे घटक घेणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे या पदार्थांचा नियमितपणे आहारात समावेश करून तुमचे आणि बाळाचे आरोग्य उत्तम ठेवू शकतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)