Marathi News> Lifestyle
Advertisement

व्हायरल इन्फेक्शन की फुफ्फुसांचा त्रास? ताप गेला तरी खोकला का राहतो?

ताप उतरल्यानंतर देखील अनेकदा खोकला काय थांबता थांबत नाही. यामागे नेमकं कारण काय? डॉक्टरांचा सल्ला काय सांगतो? 

व्हायरल इन्फेक्शन की फुफ्फुसांचा त्रास? ताप गेला तरी खोकला का राहतो?

Health News: शहरात सध्या एक व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरत असून, नागरिक मोठ्या प्रमाणावर त्याच्या विळख्यात सापडले आहेत. विशेषतः ताप, सर्दी, अंगदुखी आणि खोकला अशी लक्षणं घेऊन हजारो रुग्ण शहरातील क्लिनिक आणि रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

हा ताप सहसा 3-4 दिवसांत उतरतो, मात्र त्यानंतर सुरू होणारा खोकल्याचा त्रास 2 ते 3 आठवडे टिकतो. यामुळे रुग्णांना सततचा त्रास होतो असून अनेकजण वैतागले आहेत. या व्हायरल इन्फेक्शनमुळे फुफ्फुसांवर परिणाम होत असल्याने खोकला दीर्घकाळ जात नाही असे डॉक्टरांचे मत आहे.

पावसाळ्यातील वातावरण आणि तापमानामुळे संसर्ग वाढतोय

सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामुळे आणि हवामानातील अचानक बदलांमुळे व्हायरल संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. या काळात वातावरणात आर्द्रता वाढते आणि हवेत रोगजंतूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. परिणामी, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये याचा परिणाम अधिक जाणवतो.

रुग्णांची लक्षणं – केवळ ताप नाही तर…

ताप 3-4 दिवस टिकणारा

सततचा कोरडा किंवा खवखवणारा खोकला

घशात कोरडेपणा, खवखव

अंगदुखी, डोकेदुखी

थकवा आणि अशक्तपणा

नाक वाहणे किंवा बंद होणे

डॉक्टरांचा सल्ला, योग्य उपचार, मास्क व स्वच्छता गरजेची

प्रत्येक वर्षी या कालावधीत अशा प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स दिसून येतात. मात्र यंदा खोकल्याचा त्रास अधिक काळ टिकतो आहे. म्हणून आरोग्य विभागाने खालील बाबींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

वारंवार हात धुवा, स्वच्छता पाळा

खोकणाऱ्या आणि ताप असलेल्या लोकांपासून अंतर ठेवा

शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका, भरपूर पाणी आणि गरम पेये प्या.

घशासाठी गरम पाणी, हळद-मीठाचा गुळण्या, सूप इत्यादींचा वापर करा

डॉक्टरांकडून तपासणी आवश्यक

आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे की, लक्षणे दिसल्यास स्वतः औषधे घेऊन उपचार करण्यापेक्षा तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मेडिकलमधून सहज मिळणाऱ्या अँटीबायोटिक्सचा वापर टाळा. गरज नसताना घेतलेल्या अँटीबायोटिक्समुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि संसर्ग अधिक बळावतो.

Read More