Work Life Balance : चांगलं शिक्षण, त्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी आणि त्यानंतर हाच चांगला पगार येऊ लागल्यानंतर स्वत:ची कार, घर या अशा गरजा भागवता भागवता बऱ्याच मंडळींभोवती एक असं वर्तुळ तयार होतं, ज्याचा विळखा तोडून त्यांना बाहेर पडणंच शक्य होत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे नोकरी, करिअर आणि या सर्व महत्त्वाकांक्षा जपत असताना अनेकजण स्वत:लासुद्धा विरसून जातात.
कुटुंबीयांचा आनंद, स्वच:चा आनंद या सर्व गोष्टींना तिलांजली दिली जाते. घडाळाच्या काट्यावर उठणं, त्याच वेगानं धावणं, साचेबद्ध काम करणं आणि ठरलेल्या लोकांच्या अवतीभोवती वावरणं या चक्रामध्ये नकळतच अनेक गोष्टी मागे निसटतात आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आयुष्यावर याचा थेट परिणाम होऊ लागतो.
ताणतणाव, नैराश्य, निद्रानाश अशा समस्या सध्या नोकरदार वर्गाला भेडसावू लागतात आणि कधी त्या गंभीर होऊन बसतात याची पुसटशी कल्पनासुद्धा येत नाही. त्यामुळं वर्क- लाईफ बॅलेन्स साधता येणं हीसुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरते. मुळात या शब्दाचा अर्थ समजला तरी अनेक समस्या दूर होतील असं म्हणणं गैर ठरणार नाही.
वर्क लाईफ बॅलेन्सच्या संकल्पनेतच त्याचा अर्थ दडला आहे. नोकरी आणि व्यक्तिगत आयुष्य या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून, त्या त्या वेळेत त्या त्या गोष्टीला महत्त्वं आणि पुरेसा अपेक्षित वेळ देण्याचच हे गणित. त्यामुळं ही आकडेमोड ज्याला जमली, तोच जिंकला असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यासाठी काही लहानमोठ्या गोष्टींचीच काळजी घेतली जाणं गरजेचं असून काही गोष्टींची आखणी केल्यास मोठी मदत मिळून जाते. तर, नेमकं काय करावं?
जीवनात प्रत्येक गोष्टीला किती महत्त्वं द्यावं, त्यासाठीची एक निर्धारित वेळ असते. त्यामुळं नोकरी आणि वैयक्तिक जीवनालाही योग्य तितका वेळ द्यावा. दिवसाची सुरुवात सकारात्मक करावी. नोकरीच्या ठिकाणची वेळ पाळावी आणि त्या वेळेत कामालाच सर्वतोपरि प्राधान्य द्यावं. लक्षात घ्या कार्यालयीन वेळेत कौटुंबिक गोष्टींना महत्त्वं दिल्यास कामाच्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण क्षमतेनं लक्ष देता येत नाही.
दिवसाचे ठराविक तास नोकरीच्या ठिकाणी व्यतीत केल्यानंतर जेव्हा आपण घरी परततो तेव्हाचा वेळ हा त्या व्यक्तीसाठी स्वत:चा आणि कुटुंबाचा वेळ असतो. त्यामुळं या वेळी या आपल्या माणसांना महत्त्वं द्या. नोकरीचा ताण घरापर्यंत आणू नका.
कामाप्रती प्राथमिकता निश्चित करा. कामाचा सर्व ताण स्वत:वर घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं एस टीम म्हणून काम करा. एकमेकांच्या मदतीनं संस्थेला पुढे जाण्यात हातभार लावा. हेवेदावे दूर ठेवून, मतभेद मिटवण्यासाठी मोकळा संवाद साधा. कावेबाजपणाला कुठेही वाव देऊ नका. एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांना दाद द्यायला शिका. सर्वांना सोबत घेऊन पुढे जा.
अनेकदा नोकरी आणि खासगी आयुष्याचा ताळमेळ साधणं अशक्य होताच याचा थेट परिणाम आरोग्यावर होताना दिसतो. त्यामुळं नियमित व्यायाम, आहाराच्या चांगल्या सवयी, संवाद, ध्यानधारणा, योगसाधना अशा गोष्टींच्या मदतीनं आरोग्याची काळजी घ्या.