Ahilya Nagar : अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात चार भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. रुग्णालयाच्या भोंगळ कारभारामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. पाहुयात सविस्तर
अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील 4 भिकाऱ्यांच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. शिर्डीमधून 51 भिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यातील 10 भिकाऱ्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, त्यातील 4 भिकाऱ्यांचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यूमुळे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयत चौकशीच्या फेऱ्यात सापडलं आहे. मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. भिकाऱ्यांवर अमानुष अत्याचार केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे.
रुग्णालयाने आरोप फेटाळले
रुग्णालय प्रशासनाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत अजब स्पष्टीकरण दिलं आहे. भिकारी उपचार करताना त्रास देस असल्याने त्यांना बांधून ठेवल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलं आहे. आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. 7 दिवसात ही समिती अहवाल देणार आहे. मात्र या समितीत जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचाच समावेश केल्याने आश्चर्च व्यक्त केलं जातं आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जर भिकाऱ्यांचा मृत्यू झाला असेल तर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. तर भिकाऱ्यांच्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी केला आहे.
दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अॅक्शन मोडवर
शिर्डीत घडलेल्या दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. गुन्हेगारी कमी करण्यासाठी भिकाऱ्यांना ताब्यात घेतलं जातं आहे. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या भिकाऱ्यांच्या मृत्यूमुळे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समितीच्या अहवालात नेमकं काय समोर येणार याकडे लक्ष लागलं आहे.