Pune Vande Bharat Express: पुणेकरांच्या सेवेत लवकरच नवीन वंदे भारत येणार आहेत. पुणे स्थानकातून सुटणाऱ्या वंदे भारतची संख्या सहा इतकी होणार आहे. सध्या पुण्यातून कोल्हापूर आणि हुबळीसाठी वंदे भारत धावत आहे. त्यातच आता आणखी चार वंदे भारत एक्सप्रेस दाखल होणार आहेत. मुंबईप्रमाणेच पुण्यातही मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. त्यामुळं वंदे भारत एक्स्प्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पुण्यातून प्रवास करणाऱ्यांची क्षमता पाहता रेल्वेकडून चार नवीन वंदे भारत सुरू करण्यात येणार आहेत. सध्या पुण्यातून हुबळी आणि कोल्हापूर या शहरांसाठी वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. 28 डिसेंबर 2024मध्ये चार नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येतील, अशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली होती. पुणे- शेगाव, पुणे- वडोदरा, पुणे-सिकंदराबाद आणि पुणे-बेळगाव या चार मार्गावर वंदे भारत धावणार आहेत. त्याशिवाय पुणे-नागपूर या मार्गावर वंदे भारत स्लीपर सुरू करण्याचा विचार रेल्वेकडून करण्यात येत आहे.
पुणे-शेगाव वंदे भारत एक्स्प्रेस दौंड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना या स्थानकांवर थांबू शकते. मात्र अद्याप या तिकिट दराबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
पुणे-वडोदरा वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, लोणावळा, पनवेल, वापी, सूरत, वडोदरा या मार्गावर थांबू शकतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळं हा प्रवास 6-7 तासांपर्यंत कमी होऊ शकतो.
पुणे, दौंड, सोलापूर, गुलबर्गा, सिकंदराबाद या स्थानकांवर थांबू शकते. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळं प्रवासाचा वेळ 2-3 तास वाचू शकतो.
पुणे-बेळगाव वंदे भारत एक्स्प्रेस पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव या स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेस थांबू शकते. सध्या धावत असलेल्या पुणे-हुबळी वंदे भारतच्या पर्यायी दिवशी चालवली जाऊ शकते, अशी माहिती समोर येतेय. या एक्सप्रेसमुळं प्रवासाचा वेळ दोन-तीन तासांनी कमी होऊ शकते.
26 ऑगस्टपासून नांदेड-संभाजीनगर- मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या वंदे भारत एक्स्प्रेसमुळं सात जिल्हे थेट मुंबईशी जोडले जाणार आहेत. मुंबई ते नांदेड दरम्यानचं 771 किमीचं अतंर वंदे भारत एक्स्प्रेस 9 तासांत पूर्म करणार आहे. परभणी,जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे , दादर या स्थानकात थांबणार आहे.