Uddhav & Raj Thackeray Letter To People Of Maharashtra: शालेय शैक्षणिक अभ्यास क्रमामध्ये हिंदी भाषेच्या समावेशासंदर्भातील दोन्ही शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हिंदीच्या सक्तीविरोधात दोन्ही पक्षांनी 5 जुलै रोजी मुंबईत विशाल मोर्चाची हाक दिली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने आदेश मागे घेतल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून विजयी जल्लोष साजरा केला जाणार असून हा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये पार पडणार आहे. एकीकडे यासंदर्भातील तयारी सुरु असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील 13 कोटी जनतेला एक संयुक्त पत्र लिहिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी 'जय महाराष्ट्र' अशी दोन ओळीची कॅप्शन देत हे पत्र आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. 'आवाज मराठीचा!' या मथळ्याखाली ठाकरे बंधुंनी जारी केलेल्या या पत्रात काय म्हटलं आहे पाहूयात...
"मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं...! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो," असं या पत्रात म्हटलं आहे. तसेच पत्रात पुढे ठाकरे बंधुंनी, "त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे," असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> महाराष्ट्र नव्या 'राज'कीय भूकंपाच्या उंबरठ्यावर? राज ठाकरेंमुळे फूट पडण्याचे स्पष्ट संकेत
पत्राच्या शेवटी, "वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय...!" असं नमूद केलं आहे. पत्राच्या शेवटी, "आपले नम्र" असं म्हणत एकाच ओळीत "राज ठाकरे - उद्धव ठाकरे" असं लिहिलेलं आहे.
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/gVdS3Iddw6
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2025
सोमवारी रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची झाली भेट. सांताक्रुजच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झाली. विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वरळी डोमची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेवर चर्चा झाली.
नक्की वाचा >> 'उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलेलं', राणेंचा घणाघात; म्हणाले, 'मराठीबद्दल इतकेच...'
कार्यक्रमात पक्षांच्या प्रमुखांचीच भाषणे होण्याची शक्यता अधिक आहे. राज ठाकरे, उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आणि काँग्रेस पक्षाचे नेते भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.