559887 applications for 540 seats In Mumbai: मुंबईमधील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबरच कॉर्परेटमध्ये काम करणाऱ्यांनी तुफान गर्दी केल्याचं दिसून येत आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (आयआयएम) प्रवेश घेण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. दीड वर्षापूर्वी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा (आयआयएम) दर्जा मिळालेल्या संस्थेत आता प्रवेशासाठी अभूतपूर्वी प्रतिसाद पाहायला मिळत आहे. एमबीएसाठी या संस्थेत 540 जागा उपलब्ध आहेत. मात्र या 540 जागांसाठी तब्बल 5 लाख 59 हजार 887 अर्ज प्राप्त झाले आहेत.
पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (नीती) या संस्थेला दीड वर्षांपूर्वी आयआयएमचा दर्जा मिळाला. त्यामुळे संस्थेत प्रवेशासाठी गर्दी झाली आहे. गेल्यावर्षी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या अवधी 13 हजार 534 होती. केवळ आयआयएमचा दर्जा मिळाल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी उड्या मारल्याचे चित्र आहे.
2025 ते 2027 या शैक्षणिक वर्षासाठी एमबीएला प्रवेश घेण्यासाठी इच्छूक असलेल्यांमध्ये नुकतेच पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी उमेदवारांचाही मोठा भरणा आहे. त्यामुळेच यंदा संस्थेत प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे, अशी माहिती आयआयएम मुंबईचे संचालक प्राध्यापक मनोजकुमार तिवारी यांनी दिली.
या संस्थेत यंदाच्या वर्षी 100 टक्के प्लेसमेंट झाली असून हा सुद्धा संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी होत असलेल्या गर्दीमागील महत्त्वाचा भाग आहे. येथील विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी अॅक्सेंचर, मायक्रोसॉफ्ट अशा जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी नोकरीसाठी विविध पदांवर निवडलं आहे. या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अॅक्सेंचर या कंपनीनं 41 विद्यार्थ्यांना 45 लाख 37 हजार रुपयांचं पॅकेज दिलं आहे. सरासरी 47 लाखांचे पगार या कॅम्पस प्लेसमेंटमध्ये कंपन्यांनी विद्यार्थ्यांना दिले असून, मायक्रोसॉफ्ट कंपनीनं दोन विद्यार्थ्यांना तब्बल 54 लाखांचं पॅकेज देऊ केलं आहे. यंदाच्या वर्षी इथं कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी 198 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची रांग लागली होती. यामध्ये सर्वात कमी पकेजची ऑफर ही 18 लाख रुपयांची होती अशीही माहिती समोर आली आहे.
आयआयएम मुंबईमध्ये यंदाच्या वर्षी हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या 130 टक्क्यांनी वाढली असून, रिटेल आणि ई कॉमर्स क्षेत्रातील नोकऱ्यांची संख्या 47.73 टक्के इतकी आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे या प्लेसमेंटमध्ये आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाल्याची बाब नोंदवण्यात आल्यामुळं एकंदरच नोकरी क्षेत्रासह तरुणाईचा ओघ नेमका कोणत्या दिशेनं जात आहे याचाही अंदाज येत आहे.