चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यामधल्या केसलाघाट येथे भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ७ जण जखमी आहेत. भरधाव स्कॉर्पिओ गाडीने मूल-चंद्रपूर मार्गावर केसलाघाट इथे, नादुरुस्त उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. चंद्रपुरातले हे रहिवासी, गोंदिया येथे देवदर्शनाला गेले होते. तिथून परतताना ही दुर्घटना घडली.
मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला व एका २ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. तर जखमींमध्ये चालकासह पाच महिलांचा समावेश आहे. ही घटना बुधवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. हे सर्व प्रवासी चंद्रपूरच्या बाबूपेठ येथील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूल तालुक्यामधल्या केसलाघाट येथे भीषण अपघात
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 20, 2020
अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू, तर ७ जण जखमी
देवदर्शनाहून परतताना झाला अपघातhttps://t.co/HOK58cBO5u#Accident
भरधाव येत असलेल्या स्कार्पिओ चालकाला हा ट्रक दिसलाच नाही. अशातच काहीही कळायच्या आता स्कार्पिओ नादुरुस्त ट्रकवर धडकल्याने हा भीषण अपघात झाला. मूल पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमींना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आलं आहे.