नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर कोणीही मदत न केल्याने पतीवर मृतदेह बाईकवर घेऊन जाण्याची वेळ आली. माणुसकीला लाज आणणारी ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कारमधून जाणाऱ्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात ही घटना कैद केली. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अपघातात मृत्यू पावलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.. मदत मागूनही मदत न मिळाल्याने हतबल पतीने मृतदेह दुचाकीवरून नेण्याचा निर्णय घेतला. माणुसकीला लाज आणणारा प्रकार नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे. ग्यारसी अमित यादव असं मृतक महिलेचं नाव असून अमित यादव असं पतीचं नाव आहे,
देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास मागून वेगात आलेल्या ट्रकमुळे पत्नी पडून ट्रकच्या चाकाखाली आली. यात पत्नीचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर हतबल अमित यांनी काय करावं हे सुचत नव्हतं. त्यांनी अनेक वाहनांना हात जोडून थांबवण्याची विनंती केली. पण कोणीही थांबण्यास तयार नव्हतं. एकाही चालकाने माणुसकी दाखवली नाही. अमित यादव डोळ्यातील अश्रू पुसत हात जोडून वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणीही वाहन थांबवायाला तयार नव्हत.
यावेळी हतबल झालेल्या अमित यादव यांनी शेवटी पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधला आणि घरी मध्यप्रदेशला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पती पत्नी हे मध्यप्रदेशच्या सिवनी येथील रहिवासी आहेत. मागील 10 वर्षापासून अमित भुरा यादव (३५) याच्यासोबत कोराडी नजीकच्या लोणारा येथे ते वास्तव्यास होते.
रक्षाबंधन असल्याने अमित मोटारसायकलने लोणारा येथून देवलापारमार्गे करणपूरला जात होते. सुरुवातीला मदतीची याचना करताना कोणीही मदतीसाठी वाहन थांबवलं नाही, मात्र मृतदेह घेऊन जाताना पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर भीतीपोटी ते थांबायला तयार नव्हते. अखेर महामार्ग पोलिसांनी त्याला अडवून ग्यारसीचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे.