पालघर जिल्ह्यातील एका तरुणाची युरोपमध्ये नोकरीच्या आमिषाने नेऊन फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असं पीडित तरुणाचं नाव असून तो पालघरमधील बच्चू मिया चाळ येथे राहतो. त्याने मनसेचे तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे. कंपनीने माझ्यावर खोटे आरोप करुन कामावरुन काढून टाकलं असा दावा त्याने केला आहे. तसंच एजंटही काही मदत करणार नसल्याचं म्हटलं आहे.
उमेश याला वडोदरा येथील आयओआर कंपनीच्या माध्यमातून युरोपमधील अल्बानिया या देशात अमेक सोल्युलर ग्रुप या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून नियमांनुसार कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्याने आक्षेप घेतला असता, त्याला तिथून कामावरून काढण्यात आलं. IOR कंपनीचा एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगली नोकरी देतो असे सांगून उमेशची फसवणूक केली आणि त्याला परदेशात पाठवले. सध्या उमेश युरोपमध्ये अडचणीत असून त्याने व्हॉट्सअॅप व्हिडीओद्वारे मदतीची कळकळीची विनंती केली आहे.
व्हिडीओत तो सांगत आहे की, "नरसिम्हा सर माझी मदत करा. मला तुलसी जोशी यांनी तुमचा नंबर दिला आहे. त्यांच्याशी माझी चांगली ओळख आहे. मी युरोपमध्ये काम कऱण्यासाठी आलो होतो. एका एंजटने येथे आणून माझी फसवणूक केली आहे. कोणत्याही प्रकारची मदत तो करत नाही. इथे फार वाईट स्थिती आहे. कंपनीनेही माझ्यावर खोटे आरोप करुन कामावरुन काढून टाकलं. मी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल इन्शुरन्ससंदर्भातील विचारलं होतं. कंपनी इतकी मोठी असतानाही इन्शुरन्स का नाही विचारलं असता खोटी माहिती दिली होती. यामुळेच मला काढून टाकलं आणि माझ्यावर मी रोज सर्वांशी भांडतो असा खोटा आरोप केला. कृपया माझी मदत करा. मला येथून बाहेर काढा".
दरम्यान या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. उमेशच्या मदतीसाठी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.