Satara News : महाराष्ट्रात राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत असतानाच साताऱ्यात मोठा राजकीय ड्रामा पहायला मिळाला आहे. साताऱ्यातील वडूज नगरपंचायतीच्या सर्व नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला आहे. यामुळे वडूज नगरपंचायती नगराध्यक्ष मनीषा रवींद्र काळे या अडचणीत सापडल्या आहेत.
खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मनीषा रवींद्र काळे यांच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी, वंचितसह सर्व पक्षांच्या 16 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. नगराध्यक्ष मनीषा काळे या अपक्ष निवडून आल्या असून त्यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे.
मागील वर्षभरापासून कोणत्याही सदस्याला विश्वासात न घेता त्या मनमानी पद्धतीने वागत असल्याने याचा परिणाम वडूज शहराच्या विकासावर होत असल्यामुळे एकत्र आलेल्या 16 नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांच्या विरोधात सह्या केलेल्या अविश्वासाच्या ठरावाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे.
नगरसेविका आरती काळे, राधिका गोडसे, मनोज कुंभार, शोभा बडेकर, रेखा माळी, रेश्मा बनसोडे, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, शोभा वायदंडे, ओंकार चव्हाण, अभयकुमार देशमुख, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे, जयवंत पाटील, सचिन माळी या सर्व सदस्यांनी या अविश्वास ठरावाच्या निवेदनावर सह्या केल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख कर्मचारी संघटना पुणे विभाग यांच्या वतीने दोन दिवसीय कामबंद सामुहिक रजा आंदोलन करण्यात आले. सातारा तहसीलदार कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले आहे. एक टेबल पेक्षा जास्त टेबलचे काम, 14 वर्षांपासून प्रलंबित असलेला सुधारित वेतनाचा प्रश्न, अपुरी सामग्री आणि कमी कर्मचारी यांसारख्या विविध मागण्यांसाठी सातारा तहसीलदार कार्यालय येथील भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय सामूहिक रजा घेत काम बंद आंदोलन केलं आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील ढोकळवाडी येथे स्टेशनरी पॉईंट इंडिया या कंपनीकडून कंपनीतून निघणारे प्लास्टिक वेस्ट हे शेतांमध्ये उघड्यावर जाळले जाते आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात प्लास्टिक वेस्ट उघड्यावर जाळले जाते यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक धुराचे लोट या भागात पसरतात. परिणामी या भागातील नागरिकांना आणि या ठिकाणी असणाऱ्या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना याचा प्रचंड त्रास होतो आहे.या धुरा मुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या बाबत कंपनी कडे तक्रार करून देखील त्याकडे कंपनी कानाडोळा करते आहे.त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी ग्रामस्थानी केली आहे.