पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. स्नेहा विशाल झेंडगे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पती विशाल याने तिला रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आले तर मारुन टाकू अशी धमकीच दिली होती. यानंतर तिने गळफास घेत आमहत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.
पुण्यातील आंबेगाव पठार परिसरात राहत्या घऱात स्नेहाने आत्महत्या केली आहे. तिने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. सोलापुरात वास्तव्यास असणारे तिचे वडील कैलास सांवत यांनी याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नवरा विशाल, सासरा संजय, सासू विठाबाई आणि इतरांविरोधात गन्हा दाखल केला आहे.
स्नेहाच्या वडिलांनी आपल्याला ते कुठे राहत होते याची काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. मुलीच्या मागणीनुसार आम्ही तिचं लग्न लावून दिलं होतं. लग्नानंतर काही महिने मोहोळला राहिल्यानंतर ते पुण्यात राहायला आले होते अशी माहिती त्यांनी दिली. तसंच विशालला शेतजमीन विकत घेण्यासाठी आपण 5 लाख रुपये दिले होते असा खुलासाही त्यांनी केला आहे.
ते कुठे राहत होते याची आम्हाला काहीच माहिती नव्हती. शेंडगे यांची वेळू येथे कंपनी आहे. कंपनीत तिचे भाऊ माहिती घेण्यासाठी गेले असता त्यांना हाकलून लावण्यात आलं होतं असंही त्यांनी सांगितलं आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
"सासरच्या लोकांनी कंपनीसाठी 20 लाख रुपये मागितले. ते पैसे देऊ शकत नसल्याने सासरच्या छळाला कंटाळून आज स्नेहाने आपलं आयुष्य संपवलं. वैष्णवी हगवणे प्रकरणतातील जखमांवरील खपल्या आता कुठे धरत असताना तोवर पुण्यात अजून एक घटना घडली आहे. या सगळ्या घटना किंबहुना दर दिवसाआड कधी खून, बलात्कार, मारामारी, विनयभंग, हुंडाबळी या घटना घडत आहेत. अजूनही कायद्याचा वचक लोकांना बसत नाही. यावर काय उपाया काढावेत हे सरकार नावाच्या यंत्रणेला कळत नाही," अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.