नागपुरात तरुणाने प्रेयसीच्या सरणावर उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्याच्या कन्हान येथे प्रेयसीच्या जळत्या चितेवर उडी घेऊन प्रियकराने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण तिथे उपस्थित लोकांनी त्याला वेळीच पकडल्याने अनर्थ टळला. मात्र कन्हान नदीच्या शांती घाटावरील या घटनेमुळे एकच खळबळ उडाली
आत्महत्या करणारी तरुणी 19 वर्षांची असून, अनुराग राजेंद्र मेश्राम असं प्रियकराचं नाव आहे.. दोघं एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांची ओळख झाली आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं. 19 वर्षीय तरुणीने नैराश्येतून 8 मे रोजी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणीने सुसाईट नोट लिहिली होती. यामध्ये तिने माझ्या आत्महत्येसाठी कोणालाही त्रास देऊ नका, अनुरागचा यात दोष नाही असं लिहिलं होतं.
पोलिसांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द केला होता. त्यानंतर शांती घाटावर अंत्यसंस्कार सुरू होते. यादरम्यान अनुराग मेश्राम तिथे पोहोचला. त्याने सरणावर जाऊन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तिथे उपस्थित नागरिकांनी त्याला पकडलं आणि चोप दिल्या. यात तो जखमी झाला असून, रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नैराश्येतून प्रेयसीने आत्महत्या केल्यानंतर प्रियकराने सरणावर उडी घेण्याचा या प्रयत्नाच्या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान अनुरागला झालेल्या मारहाणीच्या चौकशीची मागणी होत आहे..