Aashadhi Wari: महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत आहेत. ही परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून अव्याहतपणे सुरू असून, यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीला हा सोहळा पंढरपुरात संपन्न होणार आहे. दरम्यान वारकऱ्यांसाठी सरकारने दिलासा देणारी बातमी जाहीर केली आहे.
पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-2025 राबववण्यात येत आहे. वारीदरम्यान कुठल्याही कारणाने वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारकडून चार लाखाची मदत मिळणार आहे.वारकऱ्यासंदर्भात सरकारकडून नवे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
जर वारीदरम्यान कुठलाही अपघात झाला आणि 60 टक्के होऊन अधिक अपंगत्व आल्यास अडीच लाखाची मदत सरकार देणार आहे. 60% पेक्षा कमी अपंगत्व आल्यास सरकारकडनं 74 हजाराची मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री वारकरी महामंडळ:14 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार, वारकऱ्यांना सोयी-सुविधा आणि कल्याणकारी योजना राबवण्यासाठी "मुख्यमंत्री वारकरी महामंडळ" स्थापन करण्यात आले आहे.या महामंडळाचे मुख्यालय पंढरपूर येथे असून, पालखी मार्गांवर भूसंपादन, कायमस्वरूपी निधी आणि वारकऱ्यांसाठी निवारा, अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत आणि विमा संरक्षण यासारख्या सुविधा पुरवण्याचे नियोजन आहे.
यंदा 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनांनुसार सामाजिक न्याय विभागामार्फत एकूण 2.21 कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या 10 पालख्यांसह या दिंड्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे, ज्यामुळे वारकऱ्यांना प्रवासात सुविधा मिळेल.
आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय वारकऱ्यांच्या सोयीसाठी 80 विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात नागपूर-मिरज दरम्यान चार विशेष गाड्यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली "चरणसेवा" उपक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये वारकऱ्यांना वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत "आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी" अभियानांतर्गत वैद्यकीय शिबिरे आणि आरोग्य केंद्रे उभारली गेली आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि समर्थ युवा फाऊंडेशन यांच्या सहकार्याने "आरोग्यवारी" उपक्रम राबवला जात आहे, ज्यामुळे वारकऱ्यांना आरोग्य सुविधा मिळत आहेत. माझी वारी, माझा संकल्प:पर्यावरणपूरक वारीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार "माझी वारी, माझा संकल्प" अभियान राबवले जात आहे. यामध्ये वारी मार्गावरील स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले जात आहे. वारी मार्गावरील गावांमध्ये मद्य आणि मांस विक्रीवर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे, ज्यामुळे वारीच्या पावित्र्याला बाधा येणार नाही.
पालखी मार्गावर 6,000 पोलिस कर्मचारी आणि 3,200 होमगार्ड तैनात करण्यात आले असून, ड्रोनद्वारे देखरेख केली जात आहे. पंढरपूर शहरात स्नानगृह, स्वच्छतागृह आणि अजस्त्र वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. तसेच, टोकन दर्शन व्यवस्थेचा प्रयोग यंदा सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र वन विभागामार्फत संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर चित्ररथ आणि कलापथकांद्वारे विविध योजनांची माहिती प्रसारित केली जात आहे.