Accident News In Marathi: बंगळुरू महामार्गावरील अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. अपघातात सुदैवाने दुचाकीवरील दोघे जण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना कारच्या डॅश कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील दोघेजण काही अंतरावर फरपटत गेले.
पुणे- बंगळुरू महामार्गावर घडलेल्या अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. हा अपघात पुणे- बंगळुरू महामार्गावरील हॉटेल टीप- टॉप इंटरनॅशनलच्या समोर घडला आहे. भरधाव कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने मागून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यावेळी दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे एक युवक बसला होता. दुचाकी चालक थेट कारवर येऊन धडकला.
कारने दुचाकीला इतक्या जोरदार धडक दिली की या धडकेत दुचाकीवरील मागे बसलेल्या दुचाकीस्वाराचे हेल्मेटदेखील धक्क्याने खाली पडले. दोघेही पुणे- बंगळुरू महामार्गावर काही अंतरावर फरफटत गेले आणि खाली कोसळले. सुदैवाने दोघे जण थोडक्यात बचावले आहेत. पाठीमागून येणाऱ्या वाहनाने प्रसंगावधान दाखवत ब्रेक दाबल्याने मोठा अपघात टळला आहे. दोघांना गंभीर इजा झाली आहे. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हिडिओत दिसत आहे की, कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर दोघेही खाली कोसळले. मात्र मागून येणाऱ्या वाहनांनी प्रसंगावधान राखत ब्रेक मारला. त्याचवेळात दोघंही वाऱ्याच्या वेगाने उठून बसले आणि रस्त्याच्या कडेला उभे राहिले. दोघंही घाबरलेले दिसत होते. मात्र, दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातात त्यांचा जीव वाचला आहे.