Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Pod Taxi : मुंबईसह ठाणे,मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार; राज्य शासनाचा एकही रुपया खर्च होणार नाही

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत ठाणे महापालिकेत पॉड टॅक्सीचे सादरीकरण झाले. मुंबई प्रमाणेच ठाणे,मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार आहे. 

Pod Taxi : मुंबईसह ठाणे,मिरा भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार; राज्य शासनाचा एकही रुपया खर्च होणार नाही

After BKC Pod Taxi In Mira Bhayandar :  मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो यांना कनेक्टिव्हीटी निर्माण व्हावी आणि जमिनीवरील वाहतूक कमी व्हावी यासाठी पॉड टॅक्सी सेवा सुरु केली जाणार आहे. बीकेसी बरोबरच ठाणे आणि मिरा-भाईंदरमध्येही पॉड टॅक्सी धावणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. पॉड टॅक्सी संदर्भात आज मंत्री सरनाईक यांच्या समोर सादरीकरण करण्यात आले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या कामांचा आढावा आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. यावेळी पॉड टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे. परंतु तिथपर्यंत पोहचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. 

रोप वे प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतुक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगती स्वरुपात चालणार आहे. तिचा वेग ताशी 60 ते 70 किमी एवढा असणार आहे. यातून एकावेळेस उभे आणि बसून 16 प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचे असेल त्याठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. 

संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून याचे व्हिल आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळी संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हील या एक किमीच्या 40 मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. 

प्रायोगीक तत्वावर ही हवाई वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. यासाठी महापालिका किंवा राज्य शासनाचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचा फायदा मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. याशिवाय मिरा भाईंदर महापालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावर चालविली जाणार आहे. तसेच एमएमआर क्षेत्रातही आता सर्व्हे केला जाणार असून ज्याठिकाणी रोप वे शक्य असेल त्याठिकाणी रोपवे आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सी शक्य असेल त्याठिकाणी ती सेवा देण्याला प्राधान्य दिले. या संदर्भातील निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत देखील झाला असून त्यानुसार आता सर्व्हे करुन पुढील निर्णय घेतला जात असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

 

Read More