Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम ठप्पच

...म्हणून काम अद्यापही ठप्प 

अधिकाऱ्यांची नियुक्ती होऊनही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचं काम ठप्पच

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंदच होता. अनेक नागरिक, आमदारांनी या मुद्द्यावर आवाजा उठवल्यानंतर राज्यपालांकडे हा विषय मांडल्यानंतर हा कक्ष सुरु करण्यासाठी आता तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण, अद्यापही या कक्षाचं कामकाज मात्र ठप्पच आहे.  

दरम्यान, ज्या तीन अधिकाऱ्यांची या कक्षासाठीची कामं पाहण्याकरता नियुक्ती झाली आहे, त्यांनी आपला पदभार सांभाळला आहे. पुढे त्यांच्यासाठी अनेक कामं प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्ष अर्ज स्वीकारणं, जुने अर्ज मार्गी लावणं ही कामं मात्र अद्यापही सुरु झालेली नाहीत. मुळात या कक्षासाठी अधिकारी नेमले असले तरीही कर्मचाऱ्यांची नियुक्ती मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. ही नियुक्ती व्हायला विलंब लागणार असल्याने राज्यातील वैद्यकीय सहाय्यता निधीवर अवलंबून असणाऱ्या गरिब रुग्णांना आणखी काही दिवस या साऱ्यामुळे काही अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

उपचारांचा मोठा खर्च, पैशांची चणचण अगदी खाण्याची आबाळ असणारे अनेक रुग्ण या कक्षाकडे धाव घेतात. तेव्हा आता येत्या काळात या महत्त्वाच्या कक्षाच्या कामाची गाडी कधी रुळावर येते याकडे सर्व गरजवंताच्या नजरा लागलेल्या असतील. 

महाराष्ट्रात दिवसांपूर्वीच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसायला लागल्याचं चित्रं स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांसहीत सर्व मंत्र्यांची दालनं बंद झाल्यामुळे सामान्य माणूस प्रशासकीय चक्रव्युहात अडकला आहे. राज्याला सध्याच्या घडीला मुख्यमंत्रीच नसल्यामुळे अनेक कामांमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.

Read More