Crime News Boy Died Due To Mobile: अहिल्यानगरमध्ये मोबाईलच्या हट्टापायी एका 16 वर्षीय मुलाने प्राण गमावल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आईने मोबाईल देण्यास नकार दिल्या या मुलाने थेट डोंगरकडावरुन खाली उडी घेत स्वत:ला संपवलं. हा सारा प्रकार आजूबाजूला अनेकजण असताना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणामुळे मुलांना लागलेलं मोबाईलचं व्यसन हा विषय पुन्हा चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे.
मोबाईल घेऊन दिला नाही, या कारणावरून 16 वर्षीय मुलाने थेट खवडा डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणाचे नाव अथर्व गोपाल तायडे असं आहे. अर्थव हा मूळचा बुलढाण्या जिल्ह्यातील जळगाव जामोदचा रहिवासी आहे. सध्या अर्थव वाळूज येथील साजापूर शिवारातील स्वातिक सिटी येथे राहत होता. अथर्व हा सध्या पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, अर्थवने त्याच्या आईकडे मोबाईल मागितला होता. मात्र आईने मोबाईल देण्यास नकार दिला. रागाच्या भरात अथर्वने तिसगाव येथील खावडा डोंगरावरून उडी मारली. आजूबाजूला अनेकजण असताना 16 वर्षीय मुलाने थेट दरीत उडी घेतल्याने अनेकांच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्थवने दरीत उडी मारल्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला.
नक्की वाचा >> अमरावतीमधील महिला पोलीस हत्या प्रकरणात Extramarital Affair कनेक्शन; 2 मित्रांच्या...
उपस्थितांनी तातडीने अर्थवचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळात तो खाली जखमी अवस्थेत आढळून आला. या ठिकाणी असलेल्या पर्यटक आणि स्थानिकांनी तातडीने अर्थवला दवाखण्यानत नेलं. मात्र डॉक्टरांना त्याला ब्रॉट डेड म्हणजेच दाखल करण्याआधीच मृत्यू झाला आहे, असं जाहीर केलं.
पोटच्या गोळ्याने डोळ्यादेखत दरीत उडी घेऊन स्वत:ला संपवल्याचं आईला समजलं तेव्हा तिने फोडलेला हंबरडा ऐकून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. अर्थवच्या आईने फोडलेला हंबरडा खरोखरच हृदयद्रावक होता. या प्रकरणामध्ये वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. सदर प्रकरणामध्ये उपस्थितांचे जबाब, आईचा जबाब आणि इतर परिस्थितीजन्य तपशील पोलिसांकडून गोळा केला जात आहे.
पालकांनी मुलांना मोबाईलचं व्यसन लागू नये यासंदर्भात वेळीच सावध होण्याची गरज या प्रकरणामुळे अधोरेखित झाली आहे. मुलांना मोबाईलच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी योग्य त्या समोपदेशकांची मदत घेणं फायद्याचं ठरु शकतं.