Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानात नागपूरमधील कुटुंब ठार झालं आहे. नागपुरात माहेर असलेल्या यशा कामदार मोढा (कामदार माहेरचे आडनाव आहे) आणि त्यांचा मुलगा रुद्र मोढा हेदेखील दुर्घटनाग्रस्त विमानात होते. याशिवाय यशा मोढा यांच्या सासू रक्षा मोढा यादेखील होत्या. नागपुरातील क्वेटा कॉलनी येथील रामपेठ येथे कामदार कुटुंब वास्तव्यास आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्व कुटुंब घरातून तातडीने निघून गेलं आहे.
अहमदाबादहून लंडन गॅटविकला दुपारी 1.38 वाजता निघालेले हे विमान, बोईंग 787-8 होते. विमानात 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, ज्यामधील 2 पायलट आणि 10 क्रू मेम्बर्स होते. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच्या सर्व 242 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
विमानातील प्रवाशांची यादी समोर आली असून, यादीत मयूर अशोक पाटील, महादेव पवार आणि आशाबेन पवार ही मराठी नावं दिसत आहे. नावांवरुन हे सर्व महाराष्ट्रातील असावं असं दिसत आहे, मात्र याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
एअर इंडियाच्या AI171 विमानात एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी 169 भारतीय, 53 ब्रिटिश, 1 कॅनेडियन आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत. या विमानात महाराष्ट्रातीलही प्रवासी होते. दरम्यान विमान दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नातेवाईकाचाही समावेश आहे. अपर्णा महाडिक एअर इंडियाच्या विमानात क्रू मेम्बर होत्या. त्या सुनील तटकरे यांच्या भाचेसून म्हणजेच भाच्याच्या पत्नी आहेत.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान मेघानी नगरमध्ये दुर्घटनाग्रस्त झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच दुर्घटनाग्रस्त झालं. हे विमान दिल्लीमधून अहमदाबादला पोहोचलं होतं आणि तेथून लंडनला रवाना होणार होतं. या दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील या विमानात होते.
एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) नुसार, विमानाने रनवे क्रमांक 23 वरून दुपारी 1.39 वाजता उड्डाण केले. त्यानंतर, विमानाने ताबडतोब एटीसीला मे डेचा संदेश दिला. या संदेशाचा अर्थ असा की विमानात आपत्कालीन परिस्थिती आहे. यानंतर, एटीसीने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रनवे क्रमांक 23 वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.