Ajit Pawar checkmate to BJP: माणिकराव कोकाटेंकडचं कृषीखातं दत्तात्रय भरणेंना देण्यात आलंय.दरम्यान भरणेंना हे खातं देण्यामागं मोठं राजकीय समीकरण असल्याची चर्चा आहे.दत्तात्रय भरणेंना कृषीखातं देऊन अजित पवारांनी भाजपच्या खेळीला चेकमेट दिल्याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. त्यामुळं मित्रामित्रांमध्ये शहकाटशहाचं शीतयुद्ध पाहायला मिळतं.कारण आत्ताचा मित्र असेल तो भविष्यातही मित्र राहिल की नाही याची शाश्वती नसते. दत्तामामा भरणेंच्या कृषिमंत्रिपदी झालेल्या प्रमोशनमागंही अशीच एक थिअरी मांडली जाऊ लागलीये. दत्तामामांना प्रमोशन देताना दादांनी अनेक आखाडे बांधल्याचं सांगण्यात येतंय. इंदापूरला राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री दत्ता भरणे असतानाही भाजपनं सोनाईचे उद्योगाचे प्रमुख प्रवीण मानेंना भाजपमध्ये प्रवेश दिलाय.
प्रवीण मानेंना भाजपमध्ये घेऊन भाजपनं भविष्यातली तरतूद केल्याची चर्चा इंदापुरात सुरु झालीये. असं असताना अजितदादांनी त्यांचे खंदे समर्थक दत्तामामा भरणेंना कृषिमंत्रिपदी प्रमोशन दिलं. कृषिमंत्रिपदामुळं दत्ता भरणेंना ताकद मिळाली असून भविष्यातल्या कोणत्याही सामन्यासाठी ते तयार राहतील अशी तरतूद करण्यात आलीय. प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले तरी कृषिमंत्री दत्तामामा तगडे आव्हान निर्माण करतील एवढी ताकद अजितदादांनी देऊन टाकलीये.
राष्ट्रवादी आणि भाजप मित्रपक्ष असले तरी बारामती लोकसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या मतदारसंघात आव्हान निर्माण करतील असे नेते घेऊन ठेवलेत.भोरमध्ये राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर आमदार असताना भाजपनं संग्राम थोपटेंना पक्षात घेतलंय.दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आमदार असताना राष्ट्रवादीनं रमेश थोरातांना पक्षात घेतलंय.पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार असताना भाजपनं संजय जगतापांना पक्षात घेतलंय
बारामतीच्या बालेकिल्ल्यात भाजपनं केलेली तटबंदी अजितदादांच्या नजरेतून सुटलीच नसेल. त्यामुळंच अजितदादांनी त्यांचे खंदे समर्थक असलेल्या दत्तामामांना आधी राज्यमंत्रिपद, नंतर कॅबिनेटमंत्रिपद दिलं. आता तर अजितदादांनी दत्तामामांना कृषिमंत्रिपद देऊन प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटलांसमोरचं आव्हान आणखीनंच मोठं केलंय. त्यामुळं अजितदादांनी कृषिखातं देऊन एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा पुण्यासह राज्यात सुरु झालीये.