अरुण मेहेत्रे आणि जावेद मुलानी, (प्रतिनिधी) बारामती : बारामतीच्या काका-पुतण्याचं नेमकं चाललंय काय हे समजायला मार्ग नाही. दोनच दिवसांपूर्वी चुलत्याच्या आशीर्वादानं आपलं बरं चाललंय असं अजितदादा म्हणाले होते. आता त्याच अजितदादांनी बारामतीच्या आजवरच्या सर्व आमदारांपैकी सर्वाधिक कामं आपणच केल्याचा दावा केलाय. हा दावा करताना त्यांनी 1952 पासून बारामतीमधील आजपर्यंतच्या सर्व आमदारांची यादी काढा, सर्वाधिक कामं मीच केली आहेत, असं सांगून टाकलंय. अजित पवारांचा रोख शरद पवारांकडे तर नाही ना, अशी चर्चा सुरू झालीय.
अजितदादांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटल्या. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मात्र मी ह्यावर जास्त बोलणार नाही म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी यावर अधिक बोलणं टाळलंय. तर शरद पवारांना टोला लगावणं अजित पवाराना परवडणारं नाही, अशा शब्दात खासदार संजय राऊतांनीही अजितदादांना टोला लगावलाय. आपण सर्वाधिक चांगला आमदार असल्याचं जाहीर करून अजित पवारांनी शरद पवारांनाच डिवचल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा : मुंबईत भयानक अपघात! बेस्ट बसखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
- 1952च्या पहिल्याच निवडणुकीत बारामतीमधून गुलाबराव मुळीक आमदार म्हणून निवडून आले
- 1957च्या निवडणुकीत नानासाहेब जगताप बारामतीचे आमदार झाले
- त्यानंतर संभाजी लोंढे यांनी बारामतीचं प्रतिनिधीत्व केलं
- 1962ला मालतीबाई शिरोळे बारामतीच्या आमदार झाल्या
- त्यानंतर 1967 ते 1990पर्यंत शरद पवार बारामतीचे आमदार होते
- आणि 1991पासून आतापर्यंत अजित पवार बारामतीचं प्रतिनिधीत्व करताहेत.
शरद पवारांच्या वाढदिवसाला अजितदादा थेट दिल्लीत गेले होते. त्यानंतर काका-पुतण्यातल्या जवळीकीची चर्चा सुरु झाली होती. अजितदादांची गेल्या काही दिवसांमधली वक्तव्य पाहता काका-पुतण्यात वैर आहे की सख्य हेच समजत नाहीये.