उर्वशी खोना, झी 24 तास, दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवू शकणारी बातमी समोर येतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) 2023 मध्ये मोठी फूट पडली. पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि त्यांचे भतीजे अजित पवार यांच्यातील मतभेदांमुळे ही फूट उद्भवली. अजित पवार यांनी 39 आमदारांसह पक्षापासून फारकत घेतली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील होऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता दिली आणि पक्षाचे नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह त्यांना दिले. यामुळे शरद पवार यांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार' असे नवे नाव आणि 'तुतारी' हे नवे चिन्ह स्वीकारावे लागले. या फुटीमुळे पक्षाचे राष्ट्रीय पक्षाचे दर्जा गमावले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पण आता पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु झालीय.
शरद पवार यांच्यासोबत जाण्यासंदर्भात अजित पवारांनी आपल्या आमदारांशी चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. शरद पवार आणि अजित पवार यांचे दोन्ही गट एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फायदा होईल अशी माहिती काही आमदारांनी अजित पवारांना दिल्याची माहिती समोर आली आहे. स्वतंत्रपणे लढल्यानं ग्राऊंडवरील कार्यकर्ता विभागल्यानं ग्रामीण भागात अजित पवार आणि शरद पवार या दोनही गटाला फटका बसण्याची शक्यता काही आमदारांनी व्यक्त केली आहेत.
अजित पवार आणि आम्ही सर्व आमदार एकत्र असतो. अशी कोणतीही चर्चा अजितदादांनी केलेली नाही,असे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. आजच्या बैठकीत किंवा कोणत्याही बैठकीत अशी चर्चा झाली नाही, आमच्या कानापर्यंत अशी चर्चा आली नाही असे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी भाजपला विचारावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी केले आहे. अद्याप राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या विलीनीकरणाची चर्चा नाही असं ते म्हणालेत. आम्ही NDAमध्ये आहोत, येणा-यांनाही NDAमध्ये राहावं लागेल असं त्यांनी म्हटल आहे. शीर्षस्थ स्तरावर विलिनीकरणाची चर्चा झाली नाही, सुरुही नाही असंही तटकरेंनी म्हटलं आहे.दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मात्र, आता दादांच्याच राष्ट्रवादीतच विलिनीकरणावरून मतभेद असल्याची माहिती मिळतेय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास दादांच्या राष्ट्रवादीमधील दोन नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे. पक्षात दोन सत्तास्थानं नको म्हणून अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलच दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. पक्षात दोन सत्तास्थान नको पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल पटेल यांच्याकडून विरोध होतं असल्याची चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास केंद्रात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यात मंत्रीपदावरून रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर विलीनीकरण झाल्यास जयंत पाटील यांना मंत्रिपद द्यायचं की प्रदेशाध्यक्षपद याबाबत देखील रस्सीखेच निर्माण होण्याची अजित पवार यांच्या नेत्यांना भीती आहे. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवरून संजय राऊतांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र डागल होते. काहींना भाजपसोबत जाण्याची तहान लागल्याचा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला होता. दरम्यान शरद पवार सत्तेस आल्यास काही लोकांची संधी हुकणार असं म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला होता. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन व्हावं असं विधान रामदास आठवले यांनी केले होते. अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्ष असल्याचंही रामदास आठवले यांनी म्हटलंय. तसंच दोन्ही पक्ष एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली होती.