Maharashtra Politics Ajit Pawar: राज्यातील अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मागील काही दिवसांपासून पु्न्हा नव्या वादात सापडले आहेत. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच स्पष्टीकरण देतानाही त्यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्याविरोधातील रोष वाढताना दिसत आहे. अशातच आता या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाने खातेबदलाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नेमका काय आहे अजित पवारांच्या पक्षाचा प्लॅन जाणून घेऊयात...
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोकाटेंकडील खातं मकरंद पाटील यांच्याकडे दिले जाण्याची दाट शक्यता आहे. मकरंद पाटलांकडे कृषी खातं सोपवण्यात आल्यास त्यांच्याकडील मदत व पुनर्वसन खाते माणिकराव कोकाटेंना दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. खातेबदल करून कोकाटेंवरील नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. वादग्रस्त माणिकाराव कोकाटेंचे मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय दिले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याची माहिती समोर येत आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांची होणारी आजची भेट टाळली आहे. अजित पवार आज मुंबईत नसल्याने भेट होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच माणिकराव कोकाटे देखील नाशिकमध्येच असल्याची माहिती मिळत आहे. सभागृहात ऑनलाईन रमी गेम केल्याप्रकरणी सध्या कृषिमंत्री टीकेच्या केंद्रस्थानी असताना याच प्रकरणी अजित पवार आणि माणिकवाव कोकाटे यांच्यात चर्चा होणार होती. मात्र आता ही भेट पुढे ढकलली गेली आहे.
दरम्यान, दुसरीकडे कोकाटेंचा व्हिडीओ पोस्ट करणारे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांनीच कृषिमंत्री पद स्वीकारावं अशी मागणी केली आहे. "सीआयडी, सीबीआय काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषिमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल," असं रोहित पवार म्हणालेत.