Chhagan Bhujbal : विधिमंडळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) रमी खेळताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर विरोधांनी कोकाटे यांनी कृषीमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा असा आग्रह धरला. आता माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रीपद काढून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कृषी खाते कोणाकडे जाणार याची चर्चा राज्यभरात पसरली होती. पण आता हा सपेन्स संपला आहे. पण त्यानंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) कृषिमंत्रीपदाची सर्वात पहिली ऑफर मला दिली होती असा दावा केला आहे. (Ajit Pawar offered Agriculture Department Minister Chhagan Bhujbal big claim maharashtra politics )
छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी असा दावा केला की, 'ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. तेव्हा अजित पवारांनी माझ्याकडे खूप आग्रह केला होता की, कृषी खातं चांगलं आहे, हे तुम्ही घ्या.'
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. तेव्हा मी म्हणाले की, ग्रामीण भागातील लोकांना संधी दिली पाहिजे. कारण माझे राजकारण हे मुंबईतील आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहते. पण, त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात. त्यामुळे आता भरणे मामा या पदाला न्याय देतील असा मला विश्वास आहे. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे, तो जास्त न्याय देऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भरणे मामा यांनी काही अडचण येईल, असं वाटत नाही. प्रत्येक खातं महत्त्वाचं असतं. प्रत्येक खातं हे चांगलं आहे. आपण कसे काम करतो यावर ते अवलंबून असते, असे देखील त्यांनी म्हटले आहे.