Beed : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीडचा दौरा केला. मात्र, अजित पवार यांच्या या दौऱ्यावेळी जिल्ह्यातील पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित नव्हते. धनंजय मुंडेच्या अनुपस्थितीमुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. दरम्यान धनंजय मुंडे यांनी दौऱ्यात स्वतःहून येणं टाळलं की अजित पवार यांनी त्यांना रोखलं याबाबत आता चर्चा रंगली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते. पक्षातील विविध कामासाठी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अजित पवार यांनी मेळावा घेतला. अतिशय महत्वाच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे यांची अनुपस्थिती मात्र खटकली आणि त्यावरून अनेक सवालही उपस्थित राहिले. दरम्यान आपले नेते नाहित म्हंटल्यावर धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या बैठकीकडे पाठ फिरवली. धनंजय मुंडे यांनी मात्र यावर स्पष्टीकरण देत प्रकृती ठिक नसल्याचं कारण दिलं.
उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. मात्र, माझी प्रकृती अद्याप ठणठणीत नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबईला जावे लागले. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकत नाही. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला मी पूर्वसूचना दिली आहे. तसेच, या गैरहजेरीबाबत कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशीही त्यांनी विनंती केली आहे.
अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मुंडे गैरहजर
एकीकडे धनंजय मुंडे यांनी आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याचं सांगितलं. मात्र आदल्या दिवशी धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. याबाबत मंत्री आणि त्यांच्या बहिण पंकजा मुंडेंना विचारलं असता, काय चाललंय मला माहित नाही, पण त्यांची तब्बेत बऱ्याच दिवसांपासून बरी नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यातील वाल्मिक कराडचा सहभाग, वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचे संबंध यामध्ये धनंजय मुंडे चांगलेच अडकले आहेत. या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना थेट राजीनामाच द्यावा लागला. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे सध्या राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. आज पक्षप्रमुख अजित दादांच्या कार्यक्रमाला जाणंही त्यांनी टाळलं. मात्र धनंजय मुंडेंनी स्वताच जाणं टाळलं की अजितदादाच सध्या मुंडेंना थोडसं दूर ठेवतायेत, याची सध्या बीडमध्ये चर्चा रंगली आहे.