Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लग्न करू पाहणाऱ्या सर्वच मुलींना अजित पवारांची कळकळीची विनंती, म्हणाले...

Ajit Pawar Speech On Vaishnavi Hagawane Death Case: लग्न करणाऱ्या सर्वच मुलींना मी एकच सांगतो की... कळकळीची विनंती करत अजित पवार असं का म्हणाले?   

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर लग्न करू पाहणाऱ्या सर्वच मुलींना अजित पवारांची कळकळीची विनंती, म्हणाले...

Ajit Pawar Speech On Vaishnavi Hagawane Death Case: पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचे नवनवीन खुलासे होत असतानाच अजित पवार यांच्या पक्षाशी हगवणे कुटुंबाचे असणारे संबंध पाहता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. ज्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांमुळंही अनेक चर्चांना उधाण आलं. याचसंदर्भात आता खुद्द अजित पवार यांनीच आपली बाजू स्पष्ट शब्दात आणि जाहीरपणे माध्यमांसमोर मांडली आहे. 

'कस्पटेंच्या मुलीसोबत दु:खद घटना घडली त्याला माझा काय दोष? मला सांगा ना... अनेक माध्यमं दाखवतायत... पण त्यात माझा काय संबंध? मी तशा प्रकारे कृत्य करायला सांगितलं?', असा खडा सवाल त्यांनी केला. सदर प्रकरणातील तपासाविषयी माहिती देताना हगवणे कुटुंब कुठंही असतील तर त्यांना पकडण्याचे निर्देश देण्यात आले होते असं सांहताना तीन टीम त्यांना पकडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, त्या दुप्पट करण्याच्याही सूचना आपण दिल्या होत्या असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. 

 

हगवणेंच्या दुसऱ्या सुनेचीही चौकशी... 

हगवणेंच्या आणखी एका सुनेकडूनही चौकशी करत नेमकं काय घडत होतं हे विचारण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्याचं सांगत आपण कस्पटेंच्या कुटुंबाला भेटणार असल्याचं पवारांनी सांगितलं. फोनवरून सर्वकाही बोलता आलं नसल्यानं प्रत्यक्षात भेटून कस्पटे कुटुबीयांशी या घटनेवर सविस्तर माहिती घेतली जाईल म्हणत, 'मी किंवा मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या असून अशा प्रकारच्या घटना घडल्याच नाही पाहिजेच यासाठीच यंत्रणा काम करत आहेत', असा विश्वास त्यांनी दिला. 

 

मुलींनी एक केलं पाहिजे... 

लग्न करु पाहणाऱ्या सर्वच मुलींना उद्देशून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळकळीची विनंतीसुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. 'माझं सगळ्या मुलींना आवाहन आहे. ज्या वधू म्हणून कोणत्या कुटुंबात जातात, त्यांना एकच सांगणं आहे की जरासाही त्यांना संशय आला आणि तक्रार केली तर ताबडतोब तिथं कारवाई करता येऊ शकते. अशानं इथपर्यंतची वेळ तुमच्यामाझ्या घरातल्या मुलींवर येणार नाही', असंही ते आग्रही सर आळवत म्हणाले.  

मनस्ताप होतो..

आपला या प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही असं म्हणताना कायदा सर्वश्रेष्ठ आहे, प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार असून लग्न झालेल्या मुलींच्या हिशोबानं आपण कायदा अधिक कडक केला असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं. 'मी फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष? मी काहीतरी बोललो, समोरची लोकं हसली...' आपल्या वक्तव्यावर अशा शब्दांत स्पष्टीकरण देत अजित पवारांनी दोष नसताना आपलं नाव यामध्ये पुढे येत असल्यानं नाराजी व्यक्त केली. 

'मी फक्त लग्न समारंभात उपस्थित होतो. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. काही संबंध नसताना माझ्या नावाची बदनामी होते. नवे-जुने सगळे कायदा पाहता जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाले पाहिजे. ज्या मुलीसोबत ही घटना घडली तिच्या वडिलांशी माझं बोलणं झालं आहे आणि आता कोल्हापूर दौऱ्यानंतर मी कस्पटे कुटुंबाला पुण्यात भेटणार आहे. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तरी सुद्धा त्या मुलीनं जर मला एकदा सांगितलं असतं की माझ्यासोबत असं असं होतंय तर मी लगेच त्यावर काही अ‍ॅक्शन घेतली असती. जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे', याचाच पुनरुच्चारही त्यांनी केला. 

Read More