Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'आपल्या बापाचं...', सरकारी निधीबद्दल वादग्रस्त विधान; 'शिरसाटांचा राजीनामा कधी?' फडणवीसांना सवाल

Sanjay Sirsat New Controversy Comment: महायुतीमधील अनेक मंत्री वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतानाच आता संजय शिरसाट यांनी एक वादग्रस्त विधान केलंय.

'आपल्या बापाचं...', सरकारी निधीबद्दल वादग्रस्त विधान; 'शिरसाटांचा राजीनामा कधी?' फडणवीसांना सवाल

Sanjay Sirsat New Controversy Comment: वादग्रस्त विधानांमुळे राज्याच्या मंत्रिमंडळातील अनेक चेहरे चर्चेत आहेत. मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांचा मुद्दा पार दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडवीसांसोबतच्या चर्चेत आल्याचंही सांगितलं जात आहे. वादग्रस्त वक्तव्यांवर लगाम घालावा असा इशारा वरिष्ठांकडून देण्यात आल्यानंतरही महायुती सरकारमधील नेत्यांमध्ये एकाहून एक वरचढ वादग्रस्त विधानं करण्याची जणू स्पर्धाच लागलीये की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या आहे. वादग्रस्त विधानं करणाऱ्यांमध्ये आता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांचा पुन्हा समावेश झाला आहे.

शिरसाट नेमकं काय म्हणाले?

शनिवारी अकोल्यात सामाजिक न्यायभवनाच्या उद्घाटन सोहळ्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीरपणे एक विधान केलं. "वसतिगृहासाठी पाच, दहा, पंधरा कोटींचा निधी मागा. नाही दिला तर नाव सांगणार नाही. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?,’ असं विधान शिरसाट यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मागाल तितका पैसा मिळेल फक्त तो योग्यरित्या खर्च झाला पाहिजे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. राज्यात सध्या काही राजकीय मंडळी आपल्या कामाने नव्हे तर वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत यामध्ये महायुतीचे नेते आघाडीवर असून त्यात आता पैसा आपल्या बापाचा नसून सरकारचा असल्याने शिरसाटांचाही समावेश झाला आहे. शिरसाट यांच्या या विधानावरुन आता विरोधीपक्षाने त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

राजीनामा कधी घेणार?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिरसाटांचा राजीनामा कधी घेणार अशी विचारणा केली आहे. "निव्वळ 5 वर्षात 25 पट संपत्ती, वादग्रस्त ठरल्यानंतर विट्स हॉटेलच्या लिलावातून माघार, भल्या मोठ्या रोकड रकमेसह स्वतःच्याच बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल, 'आपल्या बापाचा माल थोडीच आहे सरकारचा पैसा आहे लुटा' हा बेतालपणा, फडणवीसजी, वाह्यात शिरसाटचा राजीनामा कधी होणार?" असा सवाल अंधारे यांनी केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये #धृतराष्ट्र हा हॅशटॅगही वापरला आहे.

एकूण किती निधी देण्यात आलाय?

सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यात 120 वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी एक हजार 200 कोटी रुपयांच्या निधीची तरतुदही करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी याच कार्यक्रमात दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. राज्यात ठिकठिकाणी, तसेच तालुकास्तरावरही वसतिगृहे निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली सुविधा निर्माण होईल, असा विश्वास शिरसाटांनी व्यक्त केला. 

Read More