Akshaya Tritiya 2025 Gold Rate: मागील काही आठवड्यांपासून सोन्याचे भाव सातत्याने वाढताना दिसत आहेत. एप्रिलच्या शेवटून दुसऱ्या आठवड्या सोन्याच्या भावाने प्रति तोळा एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांचा कल सोने की चांदी खरेदीकडे अधिक असेल का? याबाबत आता सराफ बाजारालाही उत्सुकता आहे.
मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम पाहता, ग्राहकांचा कल सोने खरेदीकडे अधिक असू शकतो, अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांनीही सणासुदीनिमित्त विविध सवलतींच्या ऑफर्स आणल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तशा जाहिरातीही केल्या आहेत. म्हणून घरखरेदीही मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेने लादलेले 'टेरिफ' आणि डॉलरच्या भावातील चढ-उतार यामुळे सोन्याच्या भावाने प्रति तोळा एक लाख रुपयांपर्यंत उडी घेतली आहे. गेल्या महिनाभरापासून सोन्याचा भाव खाली येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यात रस असलेल्या ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे सराफांनी सांगितले. मध्यंतरी सोन्याचा भाव 56 हजार रुपये तोळा होईल, अशी अफवा होती. परिणामी, ग्राहक अधिक गोंधळात पडले होते. मात्र, आता सोन्याचा भाव थेट लाखावर पोहोचल्याने झळाळी आल्याचे पाहायला मिळत आहे.