Hapus Mango In Market: एप्रिलची चाहूल लागताच महाराष्ट्रातील प्रत्येक जण वाट पाहतो ती हापूस आंब्यांची. हापूस आंबा म्हणजे प्रत्येकाचा आवडीचं फळ आहे. मात्र यंदा हापसू आंब्यांची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं खवय्यांना मनसोक्त हापूस खाता येणार नसल्याची चिन्हे आहेत. एपीएमसी बाजारात यावर्षी हापूस हंगाम सुरळीत राहील अशी अपेक्षा होती, परंतु ऐन फळधारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने आंब्यांवर परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. यंदा 35 ते 40 टक्के उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. समाधानकारक पाऊस पडत आहे, त्यामुळे हापूस उत्पादन चांगले असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती, मात्र दुसरीकडे वेळोवेळी हवामानात होणाऱ्या बदलाचा फटका आंब्याला बसला. त्यामुळे अपेक्षित जादा उत्पादनात घट होताना दिसत आहे.
मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू झाली होती. तर मार्च मध्ये हंगाम सुरू झाला होता, मार्च मध्ये 40 ते 50 हजार पेट्या दाखल होत होत्या. यावेळी मात्र मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या आंब्यात घट होऊन कमी हापूस दाखल होत आहे. फेब्रुवारीमध्ये एक दिवस आड कोकणातील हापूसच्या पेट्या दखल होत होत्या तर सध्या बाजारात आता तीन ते साडेतीन हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम अवघा 35 ते 40 टक्के आहे. तसेच मे अखेरपर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे.
एरव्ही तीन ते चार महिने हंगाम सुरू असतो. यंदा मात्र 20 मार्च ते एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक 10मे पर्यंत राहील, असे मत घाऊक फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, देवगडचा, रायगडचा हापूस दाखल होत असून चार ते सहा डझनाच्या पेटीला तीन हजार ते सहा हजार रुपये दराने विक्री होत आहे
कोकणातून आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. प्रत्येक पेटीला साठेआठ हजार रुपये दर मिळत असल्याचे सनोर आले आहे. टप्प्याटप्याने हापूस आंब्याच्या पेट्या रवाना होऊ लागल्या आहेत. आंब्यांचे पीक कमी होत असल्याने आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.