Crime Against Police In Maharashtra: महाराष्ट्रातील पोलीसच सुरक्षित आहेत की नाही असा प्रश्न पडण्यासारख्या दोन धक्कादायक घटना मागील 48 तासांमध्ये घडल्या आहेत. पहिली घटना अमरावतीमध्ये घडली असून येथील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. तर दुसरी घटना राज्याची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात घडली आहे. येथे गस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला आहे.
अमरावतीत महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आशा घुले असं मयत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ती 38 वर्षांची होती. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमधील आशा यांच्या राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती देखील राज्य राखीव पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. हत्या झालेली महिला फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होती. महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हत्येचं कारण कळू शकलं नाही. मात्र पोलिसांनी चौकशीसाठी पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे पुण्यातील खडकीमध्ये पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला आहे. पुणे-मुंबई महामार्गावर खडकी परिसरात पेट्रोलिंग करत असलेल्या गुन्हे शाखेच्या दोन पोलिस शिपायांवर चार जणांच्या टोळीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना 31 जुलैच्या रात्री घडली. चर्च चौक खडकी येथे सुमारे रात्री 9 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
गोपाल देवसिंग कोतवाल आणि काजळे अशी जखमी झालेल्या पोलिस शिपायांची नावे असून, ते दोघेही मार्शल ड्युटीवर कार्यरत होते. पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनचालकाने गाडी अतिशय वेगात आणि वेडीवाकडी चालवताना दिसल्याने पोलिसांनी त्याला थांबवून विचारणा केली. या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या चार जणांनी पोलिसांवर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जमिनीवर पाडले आणि बेदम झोडपले.
दरम्यान या प्रकरणी गोपाल देवसिंग कोतवाल यांनी तक्रार दिल्यानंतर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना अटक केली आहे. जुनेद इक्बाल शेख (वय 27), नफीज नौशाद शेख (वय 25), युनूस युसुफ शेख (वय 25), आरिफ अक्रम शेख (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याचा गुन्हा या आरोपींवर दाखल करण्यात आला असून लवकरच त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.