Ambernath Crime: अंबरनाथमध्ये सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलं. यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे.
विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव होतं. त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी 2013 साली लग्न झालं होतं. त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू-सासरे दीर आणि भावजय यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. याच छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.
शनिवारी सकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जात आहे, हे त्यात सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला. त्यानंतर लगेचच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.
यानंतर विधी यांच्या सासरच्या मंडळींवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधी यांच्या माहेरच्यांनी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका माहेरच्यांनी घेतली. तसेच माध्यमांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली.
त्यामुळे पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र जोपर्यंत विधी यांच्या मृत्यूला कारणीभूत असणारे तिचे सासू-सासरे, दीर आणि भावजय यांना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही विधी यांचे अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका त्यांच्या माहेरच्या मंडळींनी घेतली आहे.