Amit Shah Maharashtra Daura: मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटण्याची चिन्ह आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात पालकमंत्रिपदावर तोडगा निघणार अशा चर्चा सुरु आहेत.
अमित शाहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. महायुतीत मागील अनेक दिवसांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन वाद सुरुय. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नसून अमित शाहांच्या दौऱ्यात पालकमंत्रिपदाचा निर्णय होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पालकमंत्र्यांची घोषणा झाल्यानंतर नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजन आणि रायगडचं पालकमंत्रिपद आदिती तटकरेंना देण्यात आलं होतं. दरम्यान या निर्णयानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री कधी मिळणार? असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रात्री पुण्यात दाखल होतील. यानंतर पुण्याहून सकाळी रायगड किल्ल्यासाठी रवाना होतील. सकाळी 10.45 वाजता रायगड किल्ल्यावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान अमित शाह खासदार सुनिल तटकरेंच्या निवासस्थानी भोजनासाठी थांबणार आहेत. रायगडवरुन अमित शाह मुंबईसाठी रवाना होणार आहेत. विलेपार्लेत चित्रलेखा साप्ताहिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाहांचा मुक्काम असेल. रविवारी सकाळी अमित शाह दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.
अमित शाहांच्या रायगड दौऱ्यावरुन संजय राऊतांनी सुनिल तटकरे आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तटकरेंचे नेते अजित पवार नसून अमित शाह आहेत असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
केंद्रीय गृहमंत्री उद्या रायगड दौऱ्यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात त्यांची सुनिल तटकरेंसोबत चर्चा होणारय.. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यातून पालकमंत्रिपदाचा तिढा सुटणार का? की पालकमंत्र्यासाठी रायगडला अजून वाट पाहावी लागणार? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होताय.