Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'दोन्ही भाऊ एकत्र आले तर...', मनसे-सेना युतीवर अमित ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, 'दोघांकडे एकमेकांचे...'

Raj Thackeray MNS UBT Shivsena Alliance: आदित्य ठाकरेंनी केलेल्या विधानाची चर्चा असतानाच आता अमित ठाकरेंनीही संभाव्य युतीबद्दल सूचक विधान केलं आहे.

'दोन्ही भाऊ एकत्र आले तर...', मनसे-सेना युतीवर अमित ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, 'दोघांकडे एकमेकांचे...'

Raj Thackeray MNS UBT Shivsena Alliance: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या असतानाच राज्यामध्ये युती आणि आघाड्यांसंदर्भातील चाचपणी सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्येही उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधुंनी मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र यावं अशी मागणी यापूर्वीही अनेकदा झाली आहे. मात्र आता थेट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पुढल्या पिढीतील व्यक्तीही ठाकरेंनी एकत्र येण्यासंदर्भात भाष्य करु लागल्या आहेत. आदित्य ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंनीही दोन्ही भावांनी बोललं पाहिजे असं म्हटलं आहे. अमित ठाकरेंचं हे विधान भविष्यातील युतीची नांदी तर नाही ना याबद्दलची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. 

आदित्य ठाकरेंनी सेना-मनसे युतीसंदर्भात मंगळवारीच केलेलं सूचक विधान

मंगळवारीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी त्यांचा पक्ष आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं आहे, अशी आठवण करुन देत संभाव्य युतीसाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले होते. डोंबिवलीमधील पलावा पुलाच्या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं एकत्र आंदोलन केलं होतं, असं सांगतानाच आदित्य यांनी हा युतीचाच एक भाग असल्याचं सूचित केलेलं. महाराष्ट्र हितासाठी जर आमच्या सोबत कोणी येत असेल तर स्वागत आहे. मग ते कोणीही असू आम्ही त्यांना सोबत घेऊ, असं आदित्य ठाकरेंनी युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता म्हटलं  होतं.

ठाकरे बंधुंनी एकमेकांना साद घातली होती. त्याचं पुढे काय झालं? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलेला. त्यावर आदित्य ठाकरेंनी, "आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार असेल तर आम्ही त्याला सोबत घेऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढा देऊ," असं म्हटलं होतं. 

आदित्य ठाकरेंपाठोपाठ आता अमित ठाकरेंचंही सूचक विधान

आता आदित्य ठाकरेनंतर मनसे नेते अमित ठाकरे यांचे युती संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. दोन्ही बंधू एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांशी फोनद्वारे संपर्क साधावा एकमेकांचे नंबर दोघांकडेही आहेत असंही अमित ठाकरे म्हणालेत. मुंबईमध्ये पत्रकारांनी अमित ठाकरेंना मनसे-ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीबद्दल विचारलं. 

अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना अमित ठाकरेंनी, "आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचा नंबर आहे," अशी प्रतिक्रिया नोंदवली. तसेच थेट नाव न घेता उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांचा उल्लेख न करता अमित ठाकरेंनी खोचक टोलाही लगावला. "जे सकाळी उठून बोलतात ते कोणाला फसवतात?" असा सवाल अमित ठाकरेंनी केला.

तसेच, "दोन भावांनी एकत्र यावं की नाही हे त्यांनी ठरवावे. राज ठाकरे यांची जी इच्छा असेल तीच माझी इच्छा आहे. यासाठी पुढाकार कोणीही घ्यावा, मी घेऊ शकत नाही," असंही अमित ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. 

Read More