Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा

अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे.

अण्णा उपोषणावर ठाम, पद्मभूषणही परत करण्याचा इशारा

राळेगणसिद्धी : अण्णांच्या उपोषणावर तोडगा काढायला सरकारला अपयश आलं आहे. अण्णांबरोबर गिरीश महाजन यांची चर्चा निष्फळ ठरली. उपोषण मागे घ्यावं ही विनंती करण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन गिरीश महाजनांनी अण्णांशी चर्चा केली. पण त्याला यश आलं नाही. दरम्यान अण्णा हजारे यांनी त्यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करण्याचा इशारा दिला आहे. पाच दिवस झाले सरकारने साधी दखलही घेतली नाही. अजून काही दिवस वाट पाहणार, अन्यथा ८ किंवा ९ तारखेला पद्मभूषण परत करणार, अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे.

जनेतची सेवा केली, त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनं केली, त्यामुळे सरकारने स्वतःहून पद्मभूषण पुरस्कार दिला. मी मागायला गेलो नव्हतो. आता जर जनतेच्याच प्रश्नांची दखल घेणार नसतील तर पद्मभूषण ठेऊन काय करणार, असा सवाल अण्णा हजारेंनी उपस्थित केला.

जनतेचे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार अण्णा हजारेंनी केला आहे. लोकायुक्त कायद्याचा ड्राफ्ट १९७१ सालचा आहे. तो कालबाह्य झाला आहे, त्यामुळे हा ड्राफ्ट बाजूला करा आणि लोकायुक्त कायद्याचा नवा ड्राफ्ट तयार करा, त्यासाठी नवीन समिती नियुक्त करा, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. लोकायुक्ताचा प्रश्न मिटला आहे, पण लोकपालचं काय? पाच वर्ष झाली तरी लोकपाल का नियुक्त केला नाही? लोकपाल नियुक्त होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. उद्या नाही तर परवा या, पण जोपर्यंत प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा अण्णांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्नही तसेच आहेत. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत, असं अण्णा म्हणाले.

गिरीश महाजन यांच्याशी चर्चा

अण्णांच्या बहुतांशी मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय संसदेत घेण्यात आला आहे. लोकपालबाबत १५ दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. लोकायुक्तबाबत आताच मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे, त्यामुळे ती देखील अडचण नाही. अण्णांचं वय पाहता त्यांनी उपोषण करायला नको,  असं या भेटीवेळी गिरीश महाजनांनी म्हटलं होतं. पण अखेर दोघांची बोलणी निष्फळ ठरली.

अण्णांनी लोकपालच्या अंमलबजावणीसाठी ३० जानेवारीपासून उपोषण सुरू केलंय. अण्णांच्या तब्येतीला त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच तोडगा काढण्यासाठी गिरीश महाजन राळेगणसिद्धीत गेले होते. पण बोलणी निष्फळ ठरलीयत. गिरीश महाजन राळेगणसिद्धीतून परतले आहेत. 

Read More