Ashadhi Wari 2025 : प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे असून एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष असतो. शास्त्रानुसार प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी साजरी करण्यात येते. वर्षाला 12 एकादशी असून यातील आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी अतिशय विशेष आणि महत्त्वाची मानली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीला उत्साह असतो. असं म्हणतात की, आषाढी एकादशीला भगवान विष्णू झोपी जातात. त्यामुळे या एकादशीला आषाढी एकादशी शिवाय शयनी एकादशी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर झोपी गेलेले भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील एकादशीला जागे होतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे ही एकादशी प्रबोधिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. हे चार महिने म्हणजे चातुर्मास म्हणून मानला जातो.
आषाढी एकादशीपूर्वी महाराष्ट्रातील वारकरी पंढरपूरकडे रवाना होता. वारीत लाखोंच्या संख्येत वारकरी पदयात्रा करत मुखी विठ्ठु माऊलींचा नामाचा गजर करत भक्तीत लीन होऊ पंढरपूराकडे प्रस्थान करतात. पावसाच्या सरी, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीचं वृदावंन, नाचत गात विठुरायाचा भेटीला आतुर वारकरी मैलांचा प्रवास करतात. हा नयनरम्य आणि भक्तीमय सोहळा पाहण्यासाठी परदेशातील पाहुणेही येतात. असा हा सोहळा कधीपासून सुरु होणार आहे. त्यासोबत यंदा आषाढी एकादशी कधी आहे पाहूयात.
यंदा आषाढी एकादशी वारीला सुरुवात 19 जूनला सुरुवात होणार आहे. आळंदी आणि देहूमधून पालख्या विठुरायाचा भेटीला निघणार आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी देहू वरून 18 जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी वरून 19 जून प्रस्थान करणार आहे. यंदा आषाढी एकादशीचा सोहळा 6 जुलै रोजी असणार आहे.
ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जूनला रात्री 8 वाजता आळंदीमधून प्रस्थान करणार आहे. रात्रीचा मुक्काम गांधीवाडा दर्शन मंडप इमारतीमध्ये असणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 20 तारखेला आळंदीमधून पालखी पुढच्या प्रवासाला प्रस्थान करणार आहे. दुपारचा विसावा संगमवाडी इथे असणार आहे. तर भवानी पेठेमध्ये रात्रीचा मुक्काम असेल. शनिवारी, 21 रोजी पुण्यात मुक्काम असणार आहे. रविवारी सासवडला मुक्काम, सोमवारीही पालखी सासवडमध्येच असेल. मंगळवार, 24 जूनला जेजुरीमध्ये मुक्काम राहणार आहे. पुढे वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी असं करत 5 जुलै पालखी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. 6 जूनला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगरप्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल आणि 10 जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच राहणार आहे.
बुधवार 18 जून रोजी श्रीक्षेत्र देहू येथून पालखीचं प्रस्थान होणार असून रात्रीचा मुक्काम इनामदार साहेब वाडामध्ये असणार आहे. 19 जूनला देहूतून पालखी निघणार आणि आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामाला पोहोचेल. 20 जूनला आकुर्डी, एच.ए. कॉलनी, कासारवाडी, दापोडी, छत्रपती शिवाजी नगर, संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युसन रोड असं करत रात्रीचा मुक्काम नानापेठमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये असणार आहे.
21 जूनला संपूर्ण दिवस श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, पुणे इथे असणार असून तिथेच मुक्कामही करणार आहे. 22 जूनला लोणी काळभोर, 23 जूनला यवत तसंच पुढे वरवंड, उडंवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी, इंदापूर, सराटी, अकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी असं करत शनिवार, 5 जुलै रोजी पालखी पंढरपूमध्ये दाखल होईल. 6 तारखेला आषाढी एकदशीला चंद्रभागा स्नान आणि पांडुरंग दर्शन करणार आहे.
आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी 5 जुलैला संध्याकाळी 6:58 वाजता सुरू होणार असून 6 जुलै रोजी रात्री 09:14 पर्यंत असणार आहे. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, 6 जुलै 2025 रोजी आषाढी किंवा देवशयनी एकादशीचे व्रत केलं जाणार आहे. एकादशीचे पारण 7 जुलै रोजी सकाळी 05:29 ते 08:16 या वेळेत केले जाणार आहे.
(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)