Raigad Fort News: मान्सून म्हटलं की सर्वांची पावलं आपोआप गडकिल्ल्यांकडे वळतात. पावसाळ्यामध्ये ट्रेक करणाऱ्यांची संख्या नक्कीच वाढलेली दिसते. मात्र असेही अनेकजण आहेत ते वर्षाचे बारा महिने गडकिल्ल्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असतात. गडकिल्ल्यांवर फिरणाऱ्या या भटक्यांना आधार असतो तो प्रत्येक गडकिल्ल्याच्या डोंगराच्या तळाशी असलेल्या गावातील घरांचा. ट्रेकर्सचा असाच आधार असलेल्या 'किल्ले रायगडवरील हिरकणी' असलेल्या हिरा आजींचं निधन झालं आहे. बा रायगड परिवारातील सदस्य मोहन इधाते यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन हिरा आजींसाठी एक खास पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
"हिरकणी कड्याच्या कुशीतलं ते मायेचं घर हरपलं" या मथळ्याखाली लिहिलेल्या पोस्टमध्ये, "बा रायगड परिवाराची माय- मावशी, आपली हिरा आज्जी. आता स्मृतीरूपात सोबत आहे," असं मोहन यांनी म्हटलं आहे. "राजगड ते रायगड, रायगड ते राजगड, हिरकणी कडा आरोहण, वाघ दरवाजा चढाई, भवानी कडा आरोहण मोहिमा – या सगळ्या सुरवातीचा पवित्र क्षण नेहमी एका ठिकाणी घडायचा हिरा आजींच्या घरात," असं मोहन यांनी हिरा आजींच्या घरातील आठवणी शेअर करताना सांगितलं. "तीचं घर म्हणजे एक हक्काचं, मायेचं, प्रेमाचं निवासस्थान! तिथं पाय ठेवताच मोहिमेचा थकवा विरत असे आणि मनात नवं बळ संचारायचं – तिच्या प्रेमळ स्वागतामुळे. तिच्या अंगणातून निघालेल्या पायवाटा निसर्ग आणि सेवेच्या दिशेने वळलेल्या असायच्या. छत्रपती शिवरायांचा जयघोष, ध्येय मंत्र-प्रेरणा मंत्र स्वतः ती म्हणत असे व मोहिमांची सुरवात करून देत असे," असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"तिच्या हातचा चहा, ताक, सरबत,पिठलं भाकरी – फक्त तहान-भूक भागवत नव्हते, तर मनाच्या तहानेलाही थांबवत होती. एकदा सोलर लावताना, ती म्हणाली होती, “तुमच्या आयुष्यात नेहमी प्रकाश राहो…!” त्या दिवशी दिलेला तो आशीर्वाद आजही आमच्यासोबत आहे कारण तिच्या प्रत्येक बोलण्यात आईसारखं निःस्वार्थ प्रेम होतं," असं मोहन यांनी म्हटलंय.
"हिरा आजीचं जीवन हे गडासाठी होतं. छत्रपती शिवरायांच्या पायथ्याशी राहून तिनं आयुष्य सेवेच्या यज्ञात अर्पण केलं. ती फक्त एक व्यक्ती नव्हती, ती एक संवेदनशील परंपरा, गडाची माया आणि भटक्यांचं आधारवड होती," अशी भावनिक भाषा मोहन यांनी वापरली आहे.
"आज तिचं घर तसंच आहे पण दारात उभं राहून म्हणणारी ती मावशी नाही. तरीही, तिचा सुगंध, तिचा स्वर, तिचं "या रे पोरांनो..." हे प्रेमळ हाक देणं हे सगळं गडावर हवेत तरंगतं आहे. बा रायगड परिवार तिच्या स्मृतीस कृतज्ञतेने आणि मायेने नतमस्तक होतो," असं पोस्टच्या शेवटी मोहन यांनी म्हटलंय.
"शिवचरणी तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच अखेरची प्रार्थना! हिरा आज्जी, तुझ्या घरातून मोहिमा सुरु व्हायच्या – पण आज आम्हाला वाटतं, तुझ्याशिवाय गडाकडे जाणाऱ्या वाटांची सुरुवातच हरवली आहे," असं म्हणत मोहन यांनी आपली पोस्ट संपवली आहे.