Mokhada Baby Dies: आदिवासी भागातलं भयाण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. गेली अनेक वर्ष आक्रोश मांडूनही ना प्रशासन लक्ष देत... ना लोकप्रतिनिधी.. परिणामी तिथल्या ग्रामस्थांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. इतकंच मरणानंतरही परवड होतेय.. आश्वासनांची घोषणा करणारे, विकासाच्या गप्पा मारणारे याकडे लक्ष देणार का? सात महिन्यांमध्ये पाच बळी गेले.. पण परिस्थिती जैसे थेच.
पाचवीला पुजलेलं अठरा विश्व दारिद्र्य मात्र पोटात वाढणा-या अंकुरानं येणारा काळ आनंदी असेल, ही आशा बाळगून सखाराम आणि त्याची पत्नी त्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते.. पण त्या येणा-या जीवाला हे जगही पाहता आलं नाही. तो आईच्या पोटातच कायमचा निजला.. दु:खाची परिसीमा ओलांडली गेल्यानं काय करावं, हेच या जोडप्याला सुचेनासं झालंय कारण हे सगळं घडलं ते केवळ प्रशासनाच्या अनास्थेमुळे.. सखाराम पत्नीच्या पोटात दुखू लागताच तिच्या घरातल्यांनी रूग्णवाहिकेसाठी धावपळ सुरू केली पण खूप वेळ ती मिळालीच नाही शेवटी प्रशासनानं एक खाजगी गाडी दिली.
मात्र खोडाळा आरोग्य केंद्रात गाडी पोहोचली.पण तीन तास उलटल्यावरही डॉक्टर उपचार करत नव्हते. संतापून सखारामनं अपशब्द वापरले.. तर रूग्णालयानं पोलिसांना बोलावून त्यालाच मारलं.. पत्नीची बिकट होत चाललेली अवस्था, पोटातल्या जीवाच्या काळजीनं त्यानं तेही सहन केलं. त्यानंतर सखारामला पुढच्या ग्रामीण रूग्णालयात पाठवलं. तेव्हाही रूग्णवाहिकेसाठी दोन तास वाट पाहावी लागली..
नाशिकमध्ये रूग्णालयात पोहोचल्यावर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.कारण ज्याच्यासाठी सखाराम आणि त्याची पत्नी आटापिटा करत होती तो जन्माआधीच त्यांना सोडून गेला.तिथल्या डॉक्टरांनी त्याच्या बायकोवर शस्त्रक्रिया करून तिला वाचवलं.पण नशिबाचे भोग अजूनही बाकी होते.. पुन्हा घरी जायला रूग्णवाहिका त्यांना दिली गेली नाही.हातात त्या निष्प्राण अर्भक ते प्लास्टीक पिशवीत घालून, शारीरिक, मानसिक अवस्था ढासळलेल्या पत्नीसह तो एसटीतून निघाला.. वेदना, संताप, हताश भावना आणि घाबरलेल्या अवस्थेत त्यानं 80 किलोमीटर प्रवास करून घर गाठलं.
तिन्ही वेळी रूग्णवाहिका न मिळणं, उपचार न करणं आणि या ढिसाळ कारभारामुळे नाहक बळी जाणं हे नवं नाही गेल्या सात महिन्यांमध्ये पाच जीव या प्रशासनातल्या नाकर्त्या अधिका-यांनी घेतलेत. यावर प्रश्न विचारले असता प्रशासकीय अधिका-यांनी आरोप फेटाळले. या घटनेला जबाबदार कोण? असं म्हणत माजी आमदार सुनील भुसारा यांनी टीका केलीय.
डोळ्यासमोर एखाद्याची अवस्था खालावत चालली असताना आरोग्य अधिका-याच्या पाझर फुटला नाही.. याला जबाबदार कोण? प्रशासनातले अधिकारी, नियती की गरिबी.. उत्तर नसलेला हा प्रश्न कायम इथल्या ग्रामस्थांना भेडसावतोय.